राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी मारल्या आहेत. या धाडसत्रावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. या छाप्यांनी अजित पवार यांना फारसा फरक पडणार नाही, असं धक्कादायक विधान रामदास आठवले यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
रामदास आठवले यांच्या हस्ते एका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. ईडी, सीबीआय आणि इतर काही संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्या तरी अजित पवार यांच्या कुटुंबियांवर पडलेल्या छापेमारीमध्ये केंद्र सरकारचा किंवा भाजपचा कसलाही हस्तक्षेप नाही. या यंत्रणा स्वतंत्र असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले. पण त्याच वेळी या छाप्यांनी अजित पवार यांना फारसा फरक पडणार नाही, असं धक्कादायक विधानही त्यांनी केले आहे.
या यंत्रणांनी 5 दिवस छापेमारी करण्याऐवजी कारवाई लवकर करावी, असं मतही त्यांनी व्यक्त केले. आर्यन खानवर NCB ने केलेली कारवाई योग्य असून नवाब मलिक यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केले. फिल्म इंडस्ट्रीमध्येच जास्त ड्रग्सचा वापर होतो असं सांगतानाच फिल्म इंडस्ट्री स्वच्छ असावी असंही ते म्हणाले.
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी उद्या दि. 20 ऑक्टोबर रोजी राज्यात सर्व तहसील कचेरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन करणार असल्याची घोषणा आठवले यांनी केली.