जन्म २ जुलै ठाणे येथे.
अन्विता फलटणकर एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. चार वर्षांची असताना अन्विताने भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली तर पाच वर्षांची असताना पहिल्यांदा नाटकात काम केलं होतं. शाळेत निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं, त्यांच्यामध्ये बक्षिसं मिळवणं हे करतानाच कदाचित अभिनय क्षेत्रात जायचं ठरलं असावं. म्हणूनच तिने शिक्षणही नाटक या विषयात केलं.बीए इन थिएटर या विषयात पदवी पूर्ण केल्यानंतर अन्विता नाटकात काम करत होती. अभिनय क्षेत्रात जायचं हे तिला खूप लहान असतानाच वाटलं असावं पण ते खऱ्या अर्थी जाणवलं ते वयाच्या तेराव्या वर्षी.
तिने आपले शालेय शिक्षण सरस्वती सेकंडरी स्कूल मधून पूर्ण केले तर आपले कॉलेजचे शिक्षण रुपारेल कॉलेज मधून पूर्ण केले. रूपारेल मध्ये शिकत असताना अचानक ‘टाईमपास’ या सिनेमासाठी तिची निवड झाली. तेव्हा अन्विता केवळ सोळा वर्षांची होती.
कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले पूर्ण वेळ करिअर करण्याचा निर्णय घेतला.
आतापर्यंत अनिता ने टाईमपास आणि गर्ल्स यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे. ‘गर्ल्स’ या चित्रपटातील छबीदार छबी या सुपरहिट गाण्यावर अन्विताने केलेला तुफान डान्स तर सगळ्यांच्याच डोळ्यांत भरला. मराठी चित्रपटात सोबतच तिने ‘व्हाय सो गंभीर’ या नाटकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातही ती झळकली.
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील स्वीटूने अन्विताला सहजसुंदर अभिनयामुळे प्रसिद्धी मिळाली. मालिकेचा एकंदरीतच असलेला विषय आणि स्वीटूची व्यक्तिरेखा ही बऱ्याच मुलींसाठी खूप रिलेटेबल आहे. या मालिकेत एका वजनाने जास्त असलेल्या म्हणजेच जाड्या मुलीची प्रेमकहाणी फुलविण्यात आली असून या मालिकेला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळतोय. मालिकांमधील नायिका ही चवळीची शेंग असायला हवी या विचारसरणीला छेद देणारी ही मालिका आहे.
अन्विता सोशल मीडियावर अॕक्टीव असून तिच्या डान्स-व्हिडीओजना बरेच ‘लाईक्स’मिळत असतात.
संजीव वेलणकर,पुणे