आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या टेहळणी ड्रोनवर सीमा सुरक्षा दलाने गोळीबार करून त्यास सीमेपलीकडे परतवून लावले.
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना जम्मूत आंतरराष्ट्रीय सीमेवरील अर्णिया क्षेत्रात शुक्रवारी पहाटे ४.२५ वाजता ड्रोन दिसले. त्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करताच जवानांनी गोळीबार केला. त्यामुळे ते पुन्हा पाकिस्तानी हद्दीत परत गेले, असे सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. सीमा भागाची टेहळणी करण्यासाठी हे ड्रोन आले होते. परंतु जम्मूतील हवाई दलाच्या तळावरील गेल्या रविवारच्या ड्रोन हल्ल्यानंतर जवान सतर्क होते. त्या वेळी दोन ड्रोन विमानांनी बॉम्बस्फोट घडवले होते. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर केल्याची ही पहिलीच घटना होती. त्यानंतर ड्रोन सोमवारी लष्करी आस्थापनांसह काही भागात घिरटय़ा घालत होते. मंगळवार आणि बुधवारीही असेच प्रकार घडले होते. पण जवानांनी गोळीबार करून त्यांना परतवले होते.
दरम्यान, लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी गुरुवारी असे म्हटले होते, की ड्रोन सहज उपलब्ध होऊ लागल्याने असे प्रकार घडत आहेत. एखादा देश आणि दहशतवादीही त्यांचा गैरवापर करू शकतात.
इस्लामाबादमधील भारतीय दूतावासावर गेल्या आठवडय़ात ड्रोन घिरटय़ा घालताना आढळले होते. या प्रकाराचा भारताने निषेध केला असून चौकशीची मागणी केली आहे. पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेचा भंग केला असून उच्चायुक्तालयाला धोका असल्याचे भारताने म्हटले आहे. भारतीय दूतावासाने हा विषय पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडेही मांडला होता. त्यावर पाकिस्तानने काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.