टीम इंडियाच्या फलंदाजांना मोठे फटके मारता येणार?
भारत-पाकिस्तान यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे. याआधी हे दोन्ही संघ २८ ऑगस्ट रोजी समोरासमोर आले होते. दरम्यान, रविवारी होणारा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांकडून कसून सराव केला जात आहे. असे असताना पाकिस्तान संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा हुकुमी एक्का वेगवान गोलंदाद शाहनवाझ दहनी रविवारच्या सामन्यात खेळणार नाही. हाँगकाँगसोबतच्या सामन्या दुखापत झाल्यामुळे तो हा सामना खेळू शकणार नाही.
आशिया चषक सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने पायाच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर राहण्याचा निर्णय घेतला.आफ्रिदी स्पर्धेबाहेर असल्यामुळे पाकिस्तानी संघाची मदार अन्य गोलंदाजांवर होती. यामध्ये शाहनवाझ दहनी याचाही समावेश होता. मात्र हाँगकाँगविरोधातील सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना त्याला दुखापत झाली. याच कारणामुळे तो ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान या सामन्यात खेळू शकणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तशी अधिकृत घोषणा केली असून तो या स्पर्धेत आगामी सामने खेळणार की नाही, हे चाचणी केल्यानंतरच ठरवले जाईल, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, रविवारच्या सामन्यात शाहनवाझ दहनी खेळणार नसल्यामुळे त्याच्या जागेवर मोहम्ममद हुसनैन याला संघात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. शाहीन आफ्रिदीच्या जागेवर गुसनैनला पाकिस्तानच्या ताफ्यात घेण्यात आले होते.