अभिनेत्री मलायका अरोराला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. झालेल्या कार अपघातानंतर तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबई-पुणे हायवेवर खालापूर टोल नाक्याजवळ काही गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या. दोन गाड्यांनी मलायकाला रेंज रोव्हरला धडक दिली होती. या अपघातात मलायकाच्या कपाळाला किरकोळ दुखापत झाली.
तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिची प्रकृती ठीक असून सीटी स्कॅनच्या रिपोर्टमध्येही काही आढळलं नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली. मलायकाची बहीण अमृता अरोरानेही माध्यमांना तिच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली. ‘मलायका बरी होतेय’, असं तिने सांगितलं. मलायका पुण्याहून मुंबईला परत येताना तिच्या कारचा अपघात झाला.
खालापूर टोलनाक्याजवळ तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. यापैकी दोन पर्यटकांच्या गाड्या होत्या. या दोन गाड्यांनी मलायकाच्या रेंज रोव्हरला धडक दिली. अपघातप्रवण क्षेत्रातच हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. “मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 38 किमी अंतरावर हा अपघात झाला आहे. यात तिनही वाहनांचं नुकसान झालं. अपघातानंतर ड्राइव्हरने ताबडतोब तिथून पळ काढला. तर इतर अपघातग्रस्तांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. संबंधित अपघाताबाबत चौकशी करून एफआयआर नोंदविला जाईल”, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अपघातातील तिन्ही गाड्यांचे नोंदणी क्रमांक मिळाले असून प्रत्यक्षात काय घडलं, हे समजून घेण्यासाठी मालकांशी संपर्क साधू. त्यानंतर एफआयआर नोंदविला जाईल”, असं खोपोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर म्हणाले.