देशभरात सध्या कोरोना लसीकरण जोरात सुरु आहे, पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनी तर देशात तब्बल एका दिवसात अडीच कोटी कोरोना लस देण्यात आल्या. जो की एक रेकॉर्ड आहे. आता अशातच मेरठमध्ये एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे, इथं एका व्यक्तीने तब्बल 5 वेळा कोरोनाची लस घेतल्याचं दाखवण्यात आलं आहे, हेच नाही तर सहाव्यांदा लस घेण्याची तारीखही या आजोबांना मिळाली आहे. किमान त्यांच्या कागदपत्रावरुन तरी हाच खुलासा होत आहे. या व्यक्तीकडे सध्या 3 लस घेतल्याची प्रमाणपत्र आहेत, विशेष म्हणजे हे महाशय सरधना भाजपचे बूथ अध्यक्षही राहिले आहेत. यांचं नाव आहे रामपालसिंह.
उत्तर प्रदेशच्या मेरठचा एक भाग सरधना. इथं राहणारे 73 वर्षांचे आजोबा चौधरी रामपाल सिंह. या आजोबांना कागदोपत्री तब्बल 5 वेळा लस देण्यात आली आहे. त्यांच्या लसीचा पहिला डोस 16 मार्चला तर दुसरा डोस 5 मेला झाला होता. रामपाल म्हणाले की, लस घेतल्यानंतर त्यांना लसीकरण प्रमाणपत्रही देण्यात आलं. मात्र,जेव्हा ऑनलाईन हेच प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोनदा लसीकरण प्रमाणपत्र मिळालं. तिसऱ्या प्रमाणपत्रात तर अजून एकच डोस घेतला आहे असं दाखवत आहे, आणि पुढच्या डोससाठी डिसेंबर 2021 ची तारीखही देण्यात आली आहे.
खरं पाहायला गेलं तर, रामपाल यांना फक्त 2 लसीचे डोस मिळाले आहे, जे मार्च आणि मे महिन्यात त्यांनी घेतले. 2 लसीकरण प्रमाणपत्रावरांवर लसीकरणाची तारीख 15 मे आणि 15 सप्टेंबर लिहण्यात आली आहे. पण घोळ फक्त इथं नाही आहे, रामपाल यांच्या प्रमाणपत्रात अजूनही खूप घोळ आहेत. प्रत्येकवेळी लसीकरण करणाऱ्या नर्सचं नावही एकच लिहण्यात आलं आहे. शिवाय पहिल्या प्रमाणपत्रावर रामपाल यांचं वय 73 तर दुसऱ्या प्रमाणपत्रावर त्यांचं वय 60 वर्ष लिहलं गेलं आहे. पहिल्या प्रमाणपत्रात ओळखीसाठी आधारकार्डचा उल्लेख आहे तर दुसऱ्या प्रमाणपत्रात पॅनकार्डचा.
प्रशासनाच्या गैरकारभाराचा सगळा खेळ जसा उघडकीस आला, तसं आता सर्वांनी हात वर करायला सुरुवात केली आहे. या घटनेवर शल्यचिकित्सक डॉ. अखिलेश मोहन यांनी सांगितलं की, ही पहिलीच घटना आहे, जिथं एक डोस घेतल्यानंतर 2 प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. प्रथम दर्शनी ही घटना काहीतरी कट किंवा खोडी काढण्यासाठी केल्यासारखी वाटते, कुणीतरी पॉर्टल हॅक करुन अशाप्रकारे 2 सर्टिफिकेट दिलेले असू शकतात असं डॉक्टर म्हणाले. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचंही मोहन यांनी सांगितलं.
दरम्यान, लसीकरणाच्या गोंधळाची ही पहिली कहाणी नाही. तिकडे केरळमध्येही असंच एक प्रकरण समोर आलं आहे, जिथं अर्ध्या तासात एकाच महिलेला कोरोना लसीचे 2 डोस देण्यात आलं. एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा सरकारी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या महिलेचं नाव थंदम्मा असून ती मुलासोबत लस घेण्यासाठी गेली होती.