माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेसाठी पुण्यात 125 बाईक्सची रॅली काढण्यात आली होती. यावेळी कोरोना संबंधी नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत बाईक रॅली काढणाऱ्या 80 जणांना ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांच्या 15 पथकांकडून आरोपीची धरपकड सुरु आहे.
माधव वाघाटे हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरवरील सराईत गुन्हेगार होता. व्हॉट्सअॕप स्टेटसवरुन झाल्याने वादानंतर टोळक्याने त्याची हत्या केली होती. त्यानंतर शनिवारी दुपारी त्याच्या अंत्ययात्रेत जवळपास 150 ते 200 जणांनी सहभाग घेत दुचाकी रॅली काढली होती. यापैकी 80 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिवाय त्यांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.
पुण्यातील माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराची शनिवारी पहाटे हत्या झाली होती. व्हॉट्सअॕप स्टेटसवरुन झाल्याने वादानंतर टोळक्यानं बिबवेवाडी इथं सरोजिनी क्लिनिकसमोर माधव वाघाटे याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधव वाघाटेवर अंत्यसंस्कार करण्यात्पूर्वी त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यावेळी 125 दुचाकींची रॅली काढण्यात आली होती. धनकवडी ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत ही रॅली काढण्यात आली. या प्रकरणी 150 ते 200 जणांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात सिद्धार्थ पलंग, कुणाल चव्हाण, सुनिल खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ऋषिकेश भगत, गणेश फाळके अशा वाघाटेच्या साथीदारांचा समावेश आहे. माधव वाघाटे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला तडीपारही करण्यात आलं होतं.