रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ग्राहकांना एक महत्त्वाची बातमी दिली आहे. कार प्रवास आता आणखीन सुरक्षित होणार आहे. आता 8 सीटर कार्ससह 6 एयरबॅग्स दिले जाणं अनिवार्य करण्यात आलं आहे. रस्ते सुरक्षाबाबतचा हा नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू केला जाईल. या नव्या नियमामुळे कार कंपन्या कार्सच्या किमतीत वाढ करू शकतात.
भारतात सिक्योरिटी स्टँडर्ड अर्थात सुरक्षा मानकांचं काटेकोरपणे पालन करणं आता महत्त्वाचं झालं आहे. मोठ्या कारमध्ये 6 एयरबॅग्ससह वाहन आणि पायी चालणाऱ्या प्रवाशांनाही यामुळे सुरक्षित केलं जाईल.
8 सीटर वाहनांमध्ये 6 एयरबॅग्स अनिवार्य करण्याच्या मसुद्याला अलीकडेच मंजुरी देण्यात आली आहे. सरकारने यापूर्वीच सर्व प्रवासी वाहनांना किमान दोन एयरबॅग्स असणं बंधनकारक केलं आहे. ड्रायव्हरसाठी एयरबॅगची आवश्यकता जुलै 2019 पासून लागू करण्यात आली होती, तर समोरच्या सीटवर बसलेल्या सहप्रवाशासाठी 1 जानेवारी 2022 पासून हे अनिवार्य झालं आहे.
वाहनांची समोरासमोर होणारी टक्कर आणि बाजूने होणारी टक्कर यामुळे होणारा परिणाम कमी करण्यासाठी प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी वाहनांमध्ये इतर चार एयरबॅग्सही लावण्याचा निर्णय अनिवार्य करण्यात आला आहे.
मागच्या सीटवर आजूबाजूला दोन एयरबॅग्स आणि दोन ट्यूब एयरबॅग्स दिल्याने सर्व प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुरक्षित होईल. भारतात कार प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं गडकरी म्हणाले. सरकारी आकडेवारीनुसार, 2020 मध्ये महामार्गांवर एकूण 1.16 लाख रस्ते अपघात झाले. ज्यात 47,984 लोकांचा मृत्यू झाला आहे.