गेल्या वर्षभरापासून बॉलिवूड सेलिब्रिटींवर ड्रग्जचे आरोप होत आहेत. या प्रकरणात, स्टार किड्स असल्याचं देखील समोर येत आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 20 दिवसांपासून कोठडीत आहे. अनेकवेळा सुनावणी झाल्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा त्यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. पण आता या प्रकरणात आर्यन खानने NCB वर काही गंभीर आरोप केले आहेत. आर्यनच्या म्हणण्यानुसार, एजन्सी त्याच्या चॅटचे चुकीचे वर्णन करत आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवी दिशा मिळाली असल्याचं म्हणायला हरकत नाही.
आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या वकिलांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्याच्या जामीन अर्जावर 26 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. आता अर्यनने एनसीबीवर गंभीर आरोप केले. मला याप्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं देखील तो म्हणाला.
इंडिया.कॉम मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, उच्च न्यायालयात सादर केलेल्या अपीलमध्ये आर्यन खान म्हटला आहे की, त्याच्या मोबाईल फोनवरून घेतलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. त्यांमुळे 26 ऑक्टोबर रोजी न्यायालयात काय होणार, निर्णय कोणाच्या बाजूने लागणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, आर्यनच्या अटकेनंतर अभिनेता चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री आनन्या पांडेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सलग दोन दिवस एनसीबीकडून तिची चौकशी करण्यात आली. सोमवारी देखील आनन्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं आहे. आता अनन्यानंतर आणखी स्टारकिड याप्रकरणी समोर येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.