महाराष्ट्रातल्या राजकीय भूकंपानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही वेगवान घडामोडी व्हायला सुरूवात झाली आहे. शरद पवार दिल्लीहून मुंबईत येताच राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या या बैठकीला प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनिल तटकरे, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 6 आमदार उपस्थित आहेत. आरोग्यमंत्री हे देखील सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत.
शिवसेनेचे नेमके किती आमदार गायब आहेत? याचा संख्याबळावर काय फरक पडणार? बहुमत धोक्यात आलं आहे का? शिवसेनेची तसंच काँग्रेसची भूमिका काय, याबाबत या बैठकीमध्ये खल होत आहे.
विधानपरिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले तरीही त्यांची मोठ्या प्रमाणावर मतं फुटली. शिवसेना आणि त्यांचे सहकारी असे मिळून 64 आमदार असतानाही शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना 26-26 मतं मिळाली, म्हणजेच 12 मतं ही फुटली. या धक्क्याला 24 तास उलटत नाहीत तोच एकनाथ शिंदे सूरतला रवाना झाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 32 आमदार आहेत, तर आज 4 अपक्ष आमदार सूरतला रवाना होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रातमध्ये एवढी मोठी राजकीय घडामोड घडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 1 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.