मंत्रिमंडळाचा विस्तार, १८ मंत्र्यांनी घेतली शपथ, महिला नेत्यांना वगळल्याने आणि संजय राठोड यांना स्थान दिल्याने वाद
गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. तर भाजपाकडून गिरीश महाजन,चंद्रकांत पाटील ,सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे.संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीच विरोध दर्शवला असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे एकाही महिला नेत्याला संधी न देण्यात आल्याने सरकारवर टीका होत आहे.दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे स्वत:कडे नगरविकास खातं ठेवतील तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ ही दोन मोठी खाती असू शकतात. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना महसूल तसंच सार्वजनिक बांधकाम तर सुधीर मुनगंटीवार यांना उर्जा आणि वन खातं मिळण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम : पंतप्रधान मोदी
नरेंद्र मोदी म्हणाले, “महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.”
शहांच्या फोननेही केली नाही जादू; अखेर बिहारचं सरकार कोसळलं, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा
बिहारमध्ये राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. यादरम्यान जदयूने भाजपसोबत असलेली युती तोडली आहे. काही वेळापूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी बिहारचे राज्यपालांना आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
राजीनाम्यानंतर मीडियाशी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, त्यांनी एनडीए सरकारमधील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना भाजपसोबत एक नव्हे अनेक त्रासांना सामोरं जावं लागत आहे. याबाबत लवकरच त्यांचे नेते याबाबत सविस्तर भूमिका मांडतील असंही ते म्हणाले.
तेव्हा लालू आता ‘लाल’ची कमाल; 7 वर्षात दुसऱ्यांदा JDU-RJD एकत्र
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं म्हणतात. याचाच प्रत्यय बिहारमध्ये आला आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ झाली असून 20 वर्षांहून अधिक काळ प्रतिस्पर्धी असलेले नितीश कुमार यांचा जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी सात वर्षांत दुसऱ्यांदा एकत्र सरकार चालवणार आहेत. राजकीय चढाओढीत जेडीयू आणि भाजपची युती तुटली असून आता नितीश कुमार तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली आरजेडीसोबत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले असून महाआघाडीच्या सरकार स्थापनेची ब्लू प्रिंटही तयार झाली आहे. महाआघाडीच्या सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री राहतील आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील.
नितीश कुमारांचा राजीनामा, बिहारचे ‘एकनाथ शिंदे’ कोण होणार?
महाराष्ट्रातल्या राजकीय भुकंपाला दोन महिने होत नाहीत तोच आता बिहारमध्येही राजकीय भूकंप झाला आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे, तसंच ते एनडीएमधूनही बाहेर पडणार आहेत. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना भेटून नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांकडे राजीनामा देतानाच नितीश कुमार यांनी आमदारांच्या समर्थनाचं पत्रही राज्यपालांना दिलं आहे.
नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली असली तरी आता ते नव्या सत्तास्थापनेचा फॉर्म्युला काय असणार? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. बिहारमध्ये आरजेडीचे 79, जेडीयूचे 45, काँग्रेसचे 19, डाव्यांचे 16 आणि एक अपक्ष असं 160 चं संख्याबळ आहे. बिहारमध्ये 2020 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या, म्हणजेच विधानसभा बरखास्त झाली नाही तर पुढच्या निवडणुका 2025 साली होतील.
फलंदाजाला ‘स्लो मोशन’मध्ये आऊट देणारे अम्पायर रुडी कर्टझन यांचं निधन
दक्षिण आफ्रिकेचे माजी अम्पायर रुडी कर्टझन यांचं नुकतच निधन झालं. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये एका रस्ते अपघातात कर्टझन यांचा मृत्यू झाला. 73 वर्षाचे कर्टझन गोल्फ खेळून परतत असताना हा अपघात झाला. यावेळी त्यांच्यासह असलेल्या दोघा मित्रांचाही या अपघातात मृत्यू झाला.रुडी कर्टझन यांनी आपल्या कारकीर्दीत तब्बल 209 वन डे, 108 कसोटी आणि 14 टी20 सामन्यात पंच म्हणून भूमिका बजावली होती. क्रिकेटच्या फिल्डवर फलंदाजाला अगदी स्लो मोशनमध्ये आऊट देणारे अंपायर अशी त्यांची ओळख होती. फलंदाजाला बाद देताना त्यांचं बोट अगदी हळुवारपणे वर येत असे. वेस्ट इंडिजचे माजी पंच स्टीव्ह बकनर यांच्यानंतर शंभर कसोटी सामन्यात अम्पायरिंग करणारे आणि ते दुसरे पंच ठरले होते. तर पहिल्यांदाच 200 वन डे सामन्यात पंचगिरी करण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर होता.
शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री, लोढा सगळ्यात श्रीमंत तर भुमरेंची संपत्ती सगळ्यात कमी!
सत्ता स्थापन केल्यानंतर तब्बल 39 दिवसांनी महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या 9 तर भाजपच्या 9 अशा एकूण 18 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे सरकारच्या या मंत्रिमंडळात भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा हे सगळ्यात श्रीमंत आहेत, तर संदीपान भुमरे यांची संपत्ती सगळ्यात कमी आहे. 18 पैकी 6 मंत्र्यांवर एकही गुन्हा दाखल नाही.
भाजपच्या मंत्र्यांची संपत्ती आणि गुन्हे
मंत्री संपत्ती गुन्हे
सुधीर मुनगंटीवार 11.4 कोटी 2
सुरेश खाडे 4 कोटी 3
राधाकृष्ण विखे पाटील 24 कोटी 0
चंद्रकांत पाटील 5.99 कोटी 2
मंगलप्रभात लोढा 441 कोटी 5
अतुल सावे 22 कोटी 6
विजयकुमार गावित 27 कोटी 9
गिरीश महाजन 25 कोटी ०
शिंदेंच्या मंत्र्यांची संपत्ती आणि गुन्हे
मंत्री संपत्ती गुन्हे
तानाजी सावंत 115 कोटी 0
दादा भुसे 10 कोटी 1
दीपक केसरकर 82 कोटी 0
संजय राठोड 8 कोटी 4
उदय सामंत 4 कोटी 0
शंभुराज देसाई 14 कोटी 0
गुलाबराव पाटील 5 कोटी 1
अब्दुल सत्तार 20 कोटी 8
संदिपान भुमरे 2 कोटी 9
10 दिवसांत पृथ्वीवर माजू शकतो हाहाकार; मोठ्या संकटाबाबत शास्त्रज्ञांनी केलं सावध
सध्या संपूर्ण जग कोरोना, मंकीपॉक्सशी लढा देत आहेत. हे संकट कमी की काय म्हणून जगावर आणखी एका संकटाचं सावट आहे. अवघ्या १० दिवसांतच पृथ्वीवर मोठं संकट येणार आहे, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या या संकटाबाबत तज्ज्ञांनी सावध केलं आहे. त्यामुळे आता धास्ती अधिक वाढली आहे.नासा ही अमेरिकन अंतराळ संस्था आहे. जी अंतराळातील घटनांवर लक्ष ठेवू असते. आता अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने एक संकट येत असल्याबाबात नासाने सावध केलं आहे. एक भलामोठा उत्कापिंड पृथ्वीला धडकणार असल्याचं नासाने सांगितलं आहे.गेल्या महिन्यातच हा उल्कापिंड नासाला दिसला आणि आता फक्त 10 दिवसांत म्हणजे 18 ऑगस्टला तो पृथ्वीच्या कक्षेतून जाईल. धरतीपासून तो फक्त 6.3 दशलक्ष किलोमीटरहून जाईल. पृथ्वीला तो थेट धडकणार नाही, कडेने जाईल त्यामुळे तसा धोका कमी आहे. पण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्याला आपल्याकडे खेचू शकते. त्यामुळे धोका पूर्णपणे टळलेला नाही. हा खूप मोठा उल्कापिंड आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात माजी सैनिकाचा मृत्यू, राष्ट्रगीत सुरू झालेलं ऐकलं अन् उभ्या उभ्या सोडला जीव
कोणाचा मृत्यू कधी ओढवेल, हे कोणीच सांगू शकत नाही. अशीच एक घटना नाशिकमधून समोर आली आहे. ‘आझादीका अमृत महोत्सव’ कार्यक्रमात एका माजी सैनिकाचा मृत्यू ओढवल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. ज्यात राष्ट्रगीत म्हणत असताना माजी सैनिक खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : तब्बल 2.50 लाख विद्यार्थ्यांनी उपस्थितांच्या मनात पेटविला राष्ट्राभिमान!
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज मंगळवारी विभागीय क्रीडा संकुलात जवळपास 4 हजार विद्यार्थ्यांच्या समूह राष्ट्रगीत गायनाने उपस्थितांच्या मनात राष्ट्राभिमान पेटविला. समूह राष्ट्रगीत गायनाच्या उपक्रमात वर्धा जिल्ह्यातील तब्बल 2.50 लाख विद्यार्थी, सात हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
जुहूपाठोपाठ गिरगाव चौपाटीवर ‘ब्लू बॉटल’
जुहू समुद्रकिनाऱ्यापाठोपाठच आता गिरगाव चौपाटीवरही जेलिफिशसदृश्य ‘ब्लू बॉटल’ दिसू लागले असून समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने ‘ब्लू बॉटल’ आल्यामुळे पर्यटक धास्तावले आहेत. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.जुहू समुद्रकिनाऱ्यावर जुलै महिन्यात ‘ब्लू बॉटल’ आढळले होते. त्यामुळे जुहू समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता. गिरगाव चौपटीवर ९ ऑगस्ट रोजी ‘ब्लू बॉटल’ आढळले आहेत. समुद्राच्या लाटांसोबत तरंगत ‘ब्लू बॉटल’ किनाऱ्यावर येतात. सध्या चौपाटीवर ‘ब्लू बॉटल’ विखुरलेले आहेत, असे जीवरक्षकांकडून सांगण्यात आले.
करोनानंतर चीनमध्ये आढळला आणखी एक जीवघेणा व्हायरस
करोना आणि मंकिपॉक्सनंतर आता चीनमध्ये आणखी एक जीवघेणा व्हायरस आढळून आला आहे. झुनोटिक लंग्या असे त्या व्हायरसचे नाव असून चीनमध्ये आत्तापर्यंत ३५ जणांना याची लागण झाली आहे. करोनामुळे मोठ्या प्रमाणात अनेक देशांची हानी झाली होती. त्यानंतर आता या भलत्याच आजारामुळे चीनच्या आरोग्य प्रशासनासमोर नवे संकट उभे राहिले आहे.
श्रीलंकेने जहाजास विरोध केल्याने चीन भारतावर संतप्त
उच्च तंत्रज्ञानयुक्त संशोधन कार्य करणारे चीनचे जहाज ‘युआन वँग ५’ची हंबन्टोटा बंदरातील संभाव्य भेट स्थगित करावी, अशी विनंती श्रीलंकेने चीनला केली आहे. भारताच्या दबावामुळे श्रीलंकेने असे केल्याने चीन संतप्त झाला आहे. या प्रकरणी सुरक्षाविषयक चिंता व्यक्त करून भारताने श्रीलंकेवर विनाकारण आणलेला दबाव निरर्थक असल्याची टीका चीनने सोमवारी केली आहे.रविवारी या प्रकरणी चीनच्या दूतावासाने श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक घेऊन चर्चेची मागणी केली होती. हे जहाज श्रीलंकेच्या हंबन्टोटा बंदरात ११ ते १७ ऑगस्टदरम्यान येणार होते.
“पट्या मी तुला खूप मिस करणार यार…”, प्रदीप पटवर्धन यांच्या आठवणीत प्रशांत दामले भावूक
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. प्रदीप पटवर्धन यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलेले प्रशांत दामले देखील भावूक झाले आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून भावूक पोस्ट लिहिली आहे .प्रशांत दामले हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते टीव्ही, नाटकाच्या जगतात प्रसिद्ध आहेत, तितकेच आपल्या खुमासदार पोस्टमुळे प्रसिद्ध आहेत. नुकतंच त्यांनी प्रदीप पटवर्धन यांच्याबद्दल फेसबुकवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत प्रदीप पटवर्धन यांचा फोटोही शेअर केला आहे.
SD Social Media
9850 60 3590