बॉलिवूडचा प्रसिद्ध विलन ज्याचा आवाज ऐकून आजही अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो ते म्हणजे अभिनेते अमरीश पुरी. संपूर्ण सिनेसृष्टी आजही अमरीश पुरी यांची आठवण काढते. मोगँबो बनून लोकांमध्ये दहशत निर्माण करणारा आणि गब्बर बनून लोकांना घाबरवणाऱ्या अमरीश पुरी यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत अशा अनेक भूमिकांसह सर्वांची मन जिंकली. ‘मिस्टर इंडिया’ सिनेमात मोगँबोची भूमिका पाहून अनेकांना अमरीश पुरी यांचा राग आला असेल पण तेच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मध्ये त्यांनी साकारलेला बाप अनेकांच्या डोळ्यात पाणी आणून गेला. 38 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत 450 हून अधिक कलाकृतींमध्ये काम करणाऱ्या अमरीश पुरी यांचा प्रवास काही सोप्पा नव्हता. आज ज्या काळात माणसं सेटल होण्याचा निर्णय घेतात तसाच त्यांनीही घेतला मात्र त्यांची इच्छा दुसरीकडे धावत होती. वयाच्या 31 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात आलेल्या अमरीश पुरी यांना अभिनयाची ग्लॅमरस वाट कशी सापडली जाणून घेऊया.
अमरीश पुरी यांचा जन्म 22 जून 1932मध्ये झाला. सुरुवातीचं संपूर्ण शिक्षण पंजाबमधलं. त्यानंतर के शिमल्याला गेले. तिथे त्यांनी एम कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं. अमरीश यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांचे दोन भाऊ चमन आणि मदन पुरी हिंदी सिनेमात काम करू लागले होते. भावंडांकडे बघून अमरीश यांनाही सिनेमात काम करायचं ठरवलं आणि बोरा बिस्तारा आवरुन ते मुंबईला रवाना झाले. अनेक ठिकाणी त्यांनी ऑडिशन दिलं पण त्यांना कुणीच घेईना. कोणी म्हणे तुझे डोळे मोठे बटणासारखे आहेत, तर कोणी आवाज फार चांगला नाही असं म्हणायचे. सिनेमाच्या वेडापायी मुंबईत आलोय पण राहण्याचं आणि खाण्यापिण्याचा प्रश्न सातावत होता. त्यामुळे अमरीश यांनी नोकरी करायचं ठरवलं. कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नोकरी मिळाली. ही गोष्ट 1953-54 सालची. याच काळात अमरीश नोकरी सांभाळून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम शोधायला जायचे.
सिनेमात काम मिळेल या आशेनं अमरीश मुंबईत राहिले. पोटापाण्यासाठी नोकरी सुरू होती. या सगळ्याच अनेक वर्ष लोटली. मधल्या काळात त्यांना एका भल्या व्यक्तीनं तू नाटकात का काम करत नाही. सिनेमांपर्यंत पोहोचण्यासाठी नाटक हा पर्याय असू शकतो. अमरीश यांनी ही बाब गांभीर्यानं घेतली आणि त्यांची नाळ कपूर घराण्याच्या प्रसिद्ध पृथ्वी थिएटरशी जोडली गेली. तिथे नाटक दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्याबरोबर काम करू लागले. हळू हळू त्यांचं काम चार लोकांसमोर येऊ लागलं आणि ते ज्यासाठी मुंबईत आले होते तो दिवस पूर्ण झाला. 1970मध्ये आलेल्या ‘प्रेम पुजारी’ या सिनेमात अमरीश यांनी काम केलं. यात त्यांचा भाऊ मदन पुरी यांनीही काम केलं होतं. पण अमरीश पुरी यांचा खरा प्रवास हा 1971मध्ये ‘रेशमा और शेरा’ या सिनेमातून सुरु झाला. ज्यात त्यांनी रहमत खान ही व्यक्तिरेखा साकारली होती.
पहिला सिनेमा मिळाला तेव्हा अमरीश यांचं वय जवळपास चाळीशी पर्यंत पोहोचलं होतं. नोकरी करण्यात आयुष्याची 20 वर्ष खर्ची केली होती. नोकरीत चांगलं यश आलं होतं. पण सिनेमाचा प्रवास सुरू झाला आणि अमरीश यांनी नोकरीला अलविदा म्हणून मोठी जोखीम अंगावर घेतली. पण ‘डॉन कभी रॉन्ग नही होता’ आणि त्यांचा हा निर्णय देखील अगदी राईट ठरला. वयाच्या चाळीशीत सापडलेली अभिनयाची ही ग्लॅमरस वाट अमरीश पुरी यांच्या आयुष्यात पुढची 38 वर्ष अविरतपणे सुरू राहिली. पुन्हा कधीच त्यांना मागे वळून पाहावं लागलं नाही. ‘मसलन निशांत'(1975), ‘मंथन’ (1976) सारख्या सिनेमातून ते सातत्यानं काम करत राहिले. 1980मध्ये आलेला ‘हम पांच’ मध्ये अमरीश यांनी साकारलेला ‘ठाकूर वीर प्रताप सिंह’ हा खलनायक तेव्हाच्या अनेक हिट नायकांवर भारी पडला होता. त्यानंतर सुभाष घई यांचे एकामागून एक आलेले ‘विधाता’ (1982), ‘शक्ती’ (1982) आणि ‘हिरो’ ( 1983) या सिनेमांमधून अमरीश पुरी यांनी दमदार खलनायक साकारले आणि सिनेमांमधला खलनायक कसा असावा याचा पायंडाच जणू बॉलिवूडमध्ये घातला. 1987साली आलेला ‘मिस्टर इंडिया’मधील मोगँबो तर आजही हिट आहे.
बॉलिवूडमधील अशा या दमदार कलाकारानं 2005मध्ये ब्रेन ट्यूमरसारख्या आजाराशी झुंज दिली. त्यांची झुंज अपयशी ठरली आणि 12 जानेवारी 2005 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘किसना’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.