आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा रोमांचक विजय झाला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला विजयासाठी 11 रनची गरज होती, तेव्हा दहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या नसीम शाहने फजल हक फारुकीला 20 ओव्हरच्या पहिल्या दोन्ही बॉलला सिक्स मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तानच्या या विजयासोबतच भारताचं आशिया कपच्या फायनलमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे. आता रविवारी 11 सप्टेंबरला पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आशिया कपची फायनल होईल.
अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा 130 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात अत्यंत खराब झाली. कर्णधार बाबर आझम पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. पाकिस्तानने 110 रनवर 8वी आणि 118 रनवर 9वी विकेट गमावली तेव्हा, अफगाणिस्तानचा विजय होईल, असं वाटलं होतं, पण नसीम शाहने अफगाणिस्तानच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणला.
पाकिस्तानकडून शादाब खानने सर्वाधिक 36 रन केले तर इफ्तिकार अहमदने 30 रनची खेळी केली. नसीम शाहने 4 बॉलमध्ये नाबाद 14 रन केले. अफगाणिस्तानकडून फजल हक फारुकी आणि फरीद अहमद मलिक यांना 3-3 विकेट मिळाल्या तर राशिद खानला 2 विकेट घेण्यात यश आलं.
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर पाकिस्तानी बॉलर्सनी अफगाणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 129/6 वर रोखलं. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झादरानने सर्वाधिक 35 रन केले, तर हजरतुल्लाह झझई 21, गुरबाझ 17 रनवर आऊट झाले. राशिद खान 18 रनवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून हारिस राऊफला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या. तर नसीम शाह, मोहम्मद हसनेन, नवाझ आणि शादाब खान यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.