आज दि.२ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

तीन लोकसभा, 29 विधानसभा
पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू

देशभरातील तीन लोकसभा तसेच २९ विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांची आज मतमोजणी सुरू आहे. ३० ऑक्टोबरला मतदान पार पडले होते. दादरा नगर हवेलीतून शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर आघाडीवर आहेत. पश्चिम बंगालमध्ये गोसाबा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. हरयाणाच्या एलेनाबाद विधानसभा मतदारसंघात अभय चौटाला यांची आघाडी कायम आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभेची जागा काँग्रेस उमेदवार प्रतिभा सिंग यांनी जिंकली आहे. मेघालयातील तिन्ही जागांवर सत्ताधारी पक्ष आघाडीवर आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत. आंध्र प्रदेशच्या बडवेलमध्ये मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचा पक्ष वायएसआर काँग्रेसचे उमेदवार ९० हजार मतांनी आघाडीवर आहेत. राजस्थानच्या धारियावाड आणि वल्लभनगरमधून काँग्रेसचे नागराज मीना आणि प्रिती शेखावत यांनी आघाडी कायम आहे. कर्नाटकच्या सिंदगीमध्ये भाजपा उमेदवार आघाडीवर असून हंगालमध्ये काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहे.

अजित पवार यांना पाठवली
आयकर विभागाने नोटीस

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत पवार कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाने अजित पवारांना नोटीस पाठवली आहे. आयकर विभागाने पाठवलेली नोटीस हा ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पवारांच्या मालमत्तावर कारवाई करण्यासंदर्भातील नोटीस अजित पवार यांना पाठवण्यात आल्याचं वृत्त आहे.

मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून
‘कित्तूर कर्नाटक प्रदेश’ ठेवण्याचा निर्णय

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक प्रदेश’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले की, मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक प्रदेश’ केले जाईल .वारंवार सीमा वाद निर्माण होत असताना जुने नाव ठेवण्यात अर्थ नाही, त्यामुळे या भागाचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त ‘कर्नाटक राज्योत्सवा’दरम्यान बोम्मई यांनी ही घोषणा केली.

मार्क झुकरबर्गला दिला
पायउतार होण्याचा सल्ला

पूर्वाश्रमीच्या फेसबुकच्या उत्पादन व्यवस्थापक असलेल्या फ्रान्सेस हॉगेन या महिला कर्मचाऱ्याने तिचा माजी बॉस आणि फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन पायउतार होण्याचा सल्ला दिलाय. अनेक गोष्टी वापरुन कंपनीचं रिब्रॅण्डींग करण्याऐवजी मार्कने पदाचा राजीनामा द्यावा असं हॉगेननं म्हटलं आहे. हॉगेनने फेसबुकने चुकीच्या पद्धतीने कागदपत्रं वापरुन माहितीचा वापर केल्याच्या धक्कादायक दावा काही आठवड्यांपूर्वी केलेला.

Whatsapp हॅक करुन
लुटणाऱ्या विदेशी नागरिकाला अटक

दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागाने Whatsapp हॅक करणाऱ्या एका विदेशी नागरिकाला अटक केली आहे. ही टोळी एका ऍप्लिकेशनच्या मदतीने Whatsapp अकाऊंट हॅक करायची. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मोबाइलमधले मेसेज आणि संपर्क आरोपीच्या लॅपटॉपमध्ये यायचे. ही गँग त्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या लोकांशी संपर्क साधायची आणि त्यांच्याकडे पैसे मागायची. त्यामुळे त्या लोकांना वाटायचं की आपला मित्र किंवा नातेवाईकच आपल्याकडे पैसे मागत आहेत. अशा प्रकारे कॉन्टॅक्टमधल्या इतर लोकांची Whatsapp हॅक करुन ही टोळी त्यांनाही लुटत होती.

सोशल मीडियावरुन
राज कुंद्राची एक्झिट

पॉर्नोग्राफी प्रकरणी तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर राज कुंद्रा हा अद्याप समोर आलेला नाही. त्याने सोशल मीडियावरुन एक्झिट घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
राज कुंद्राने त्याचे इन्स्टाग्राम आणि ट्वीटर अकाऊंट डिलीट केले आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर नेटकऱ्यांनी त्याला फार ट्रोल केले होते. त्यामुळेच त्याने सोशल मीडिया अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला असावा, असं बोललं जात आहे.

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा
कडाका वाढण्याची शक्यता

राज्यात पुन्हा एकदा हवामान बदल जाणवत असून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दिवाळीनंतर वाढण्याची शक्यता आहे, तर दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला.
खरे तर दोन दिवसांपूर्वी उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला होता. नाशिकचे तापमान 12.8 पर्यंत खाली आले, तर जळगावमध्ये राज्यात सर्वात नीचांकी 12 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली.

हायवे वरील खड्ड्यात
उटणे लावून केली अंघोळ

दिवाळी पहाट म्हटलं की मस्त सुगंधी उटणं लावून अंघोळ करुन दिवसाची प्रसन्न सुरुवात हे जवळजवळ ठरलेलं गणित आहे. मात्र सांगली शहरांमधील एका पठ्ठ्याने दिवाळीची पहिली अंघोळ चक्क रस्त्यावरील खड्ड्यामध्ये केलीय. सांगली-इस्लामपूर हायवेवरील खड्ड्यात दिवाळीची पहिली अंघोळ करुन राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी अनोखं आंदोलन केलं आहे.

टी20 विश्वचषक, इंग्लंडची
सेमीफायनलमध्ये एन्ट्री

इंग्लंड क्रिकेट संघाने यंदाच्या टी20 विश्वचषकातील आपली दमदार कामगिरी सुरुच ठेवली आहे. त्यांनी श्रीलंका संघाला मात देत स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवला आहे. यष्टीरक्षक जोस बटलरने दमदार शतक ठोकत हा विजय पक्का केला. या विजयासह इंग्लंडने सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवलीच आहे. शिवाय त्यांचा कर्णधार इयॉन मॉर्गन हा सर्वाधिक टी20 सामन्यांमध्ये विजय मिळवणारा कर्णधार ठरला आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी याला मागे टाकलं आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.