प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करु या…

 सर्व प्रथम सर्व बंधु भगिनींना, विद्यार्थी  मित्रांना दिपावलीच्या हार्दिक सदिच्छा !

भारत देश म्हटला म्हणजे सण उत्सवांची रेलचेल ! प्रत्येक समाजात आपापले सण, उत्सव साजरा करण्याची आपली परंपरा आहे. त्याच प्रमाणे दिपावली सण म्हणजे सर्वांच्या आनंदाला उधाण आणणारा सण. दिपावलीच्या पर्वात नविन कपडे, दागिने, चैनीच्या वस्तू तसचं भरपूर फटाके सुद्धा खरेदी केले जातात. परंतु हे फटाके फोडल्या नंतर त्याचे काय दुष्परिणाम होतात याची आपणास कल्पना नसते.
तर चला आता आपण प्रदुषण मुक्त दिपावली अर्थात फटाकेमुक्त दिवाळी साजरे करण्यासाठी प्रयत्न करु या.

फटाक्यावर बंदी आणली पाहिजे ,दिपावलीत कमी आवाजाचे, कमी प्रदूषण करणारे फटाके फोडले जावेत अशी अपेक्षा ,चर्चा नेहमीच दिवाळी पूर्वी कानावर येते , मात्र त्यासाठी कोणीही प्रयत्न करावयास तयार होत नाही. परंतु फटाक्यामुळे पसरणारा प्रकाश आणि होणारा आवाज यामुळे मिळणारा आनंद क्षणिक असतो, मात्र त्यामुळे ध्वनी, वायू, जमीन आणि पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होते. हे टाळण्यासाठी 1986 साली पर्यावरण संरक्षण कायदा होवून त्याची अंमलबजावणी सुरु झाली. मात्र त्याची माहिती कोणासही नाही. या अंतर्गत वरील चारही प्रकारच्या प्रदूषणा बाबत जबाबदारी निर्माण झाली. कायद्याची अंमलबजावणी झाली किंवा नाही हे पहाण्यासाठी उच्च न्यायालयाच्या स्तरावर न्यायाधिकरण नेमले आहे, त्यात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश तसेच जिल्हा न्यायालयातील न्यायाधिशांचा समावेश असतो. त्यात दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. जप्तीआदेश सुद्धा ते पारित करु शकतात. एव्हढचं नव्हे तर जिल्हा व उप विभागीय दंडाधिकारी यांना पोलीसांनी प्रदूषणाबाबत माहिती अथवा सूचना दिल्यास तेही यास आळा घालू शकतात. मात्र कायदे कितीही केले तरी सामाजिक दृष्ट्या जागरुकता होणेसाठी व वाढविण्यासाठी तसेच अनेक पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा सहजासहजी बंद होणार नसली तरी त्यासाठी सर्वांगानं आवश्यक ते प्रयत्न सातत्याने व्हायला हवेत. यावर सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली सह संपूर्ण महानगर दिल्ली आणि संपूर्ण राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात (एनसीआर) शोभेच्या आणि आवाजाच्या अशा दोन्हीही प्रकारच्या फटाकांच्या विक्रीवरील बंदी लागू केल्यामुळे लाखो दिल्ली वासियांना ही दिवाळी फटाक्या विना साजरी करावी लागणार आहे. या सोबतच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियानाची सुरुवात केली होती. हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी. यासाठी शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ ही त्यांनी दिली होती. ही बाब आनंदाची म्हणावी लागेल.

फटाका फोडल्याने काय होते ?

दिपावलीतील फटाके आणि शोभेच्या दारुची खरेदी आणि नंतर वापर हा आनंदाचा भाग मानला जातो. परंतु आता सुजाण नागरिक या बाबतीत विचार करु लागले आहेत. असे लक्षात येते की या क्षणिक आनंदासाठी अनेक दूष्परिणाम होतात.जसे की (1) प्रचंड ध्वनी प्रदूषण (2) प्रचंड वायू प्रदूषण (3) अपघाताने भाजणे (4) वृद्ध, आजारी, परीक्षार्थी या सर्वांना फटाका फोडण्यामुळे त्रास होतो. (5) आग लागणे (6) फटाके बालकामगार तयार करतात. (7) फटाके खरेदीतून या चुकीच्या पद्धतीला मान्यता व स्थिरता येते.(8) फटाके व शोभेची दारु उडविणे हे 100 %अनुत्पादक आहे. पैशांचा धूर काढणे असचं त्याचं वर्णन करावे लागते .(9) फटाके फोडल्याने पक्षांचे अकाली स्थलांतर होते.

आपण फटाके नक्की का फोडतो ?

1) बालमजुरीला प्रोत्साहन देण्यासाठी ?- फटाके तयार करण्याच्या कारखान्यात अनेक छोटी बालके दहा ते बारा तास काम करतात. आपल्या मौजेसाठी त्या मुलांना विषारी वातावरणात काम करुन त्यांचे जीवन घालावे , असे आपणास वाटते का ?

2) करोडो रुपयांची होळी करण्यासाठी..? – या फटाक्यांची उलाढाल थोडी थोडकी नव्हे तर चारशे ते साडे चारशे कोटी रुपयांचा आपण एका क्षणात त्यांचा चुराडा करतो. तेच पैसे देशाच्या विकास कामांसाठी वापरु शकत नाही का..?

3) ध्वनी प्रदुषण होण्यासाठी ..? – फटाक्यांचा आवाज लहान मुलांच्या ऊरात धडकी तर वृद्धांची आणि आजारी लोकांची झोप उडवतो, त्यामुळे मानसिक आणि भावनिक ताण वाढतो. असे आयुष्य आपल्याला जगायचे आहे काय..?

4) वायु प्रदुषण होण्यासाठी ..? – फटाक्यातून कार्बन मोनाॕक्साईड , सल्फरनायट्रोजन डाॕयआॕक्साईड या सारख्या विषारी वायूंचे उत्सर्जन होते. त्यामुळे दृष्टीदोष , दमा , अॕलर्जी , हृदयरोग व फुफ्फुसांचा कर्करोग यांना आपण आमंत्रण देत नाही आहोत का..?

5) जीवघेणे अपघात होण्यासाठी…? – दरवर्षी हजारो मुले फटाके पेटवतांना भाजतात, काहींना अंधत्व येते, तर काही जीवानीशी जातात. फटाक्यांमुळे मोठमोठया गोदामांना , दुकानांना आगी लागतात. तरी ही फटाके फोडायचा अट्टहास का…?

6) पर्यावरणाचा ऱ्हास होण्यासाठी …? – फटाके बनविण्यासाठी मुख्यत्वे कागदांचा वापर होतो. फटाके फुटल्यामुळे त्या कागदांची राख होते. यासाठी लागणाऱ्या कित्येक टन कागदासाठी लाखो वृक्षांच्या तोडीला प्रोत्साहन मिळत नाही का…?

फटाके केव्हा फोडले जातात….?

1) दिवाळीच्या वेळेस,आनंदाच्या क्षणी 2) भारतीय टिमची क्रिकेट मॕच विजयी झाल्यावर 3 ) नवीन वर्षाच्या प्रारंभी 4) एखाद्या निवडणूकीत उमेदवार विजयी झाल्यावर 5) लग्नाच्यावेळी टाळी लागल्यावर काही उत्साही मंडळी फटाके फोडतात. त्याची ठिणगी मंडपावर पडून आग लागून जिवीत व वित्त हानी झाल्याच्या घटना आपण अनेकवेळा पाहिल्या वा ऐकल्या असतीलच. त्याबाबतचे दोन उदाहरणे आपल्यासमोर मांडत आहे. 1) मागील 8 -10 वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील फटाक्यांच्या कारखान्याला आग लागून प्रचंड स्फोट झाला होता. त्या कारखान्यात काम करणारे अनेक बाल आणि प्रौढ कामगारांचा हकनाक जीव गेला. आर्थिक नुकसान झाले ते वेगळेच. 2 ) मागील दोन तीन वर्षांपूवी औरंगाबाद येथील फटाक्यांच्या दुकानाला आगी लागण्याची घटना घडली होती, त्यावेळी फटाक्यांच्या दुकानात आग लागल्यावर आजुबाजूच्या परिसरातील जवळपास 40 ते 45 दुचाकी व अनेक चारचाकी वाहने जळून अक्षरशः बेचिराख झाले होते. त्या आगीत अनेक निष्पाप नागरीकांना जीव गमवावा लागला होता. अशा अनेक घटना दिवसेंदिवस घडत आहेत. यासाठी आपण सर्वांनी फटाके न फोडण्याचा किंवा कमी प्रमाणात फटाके फोडण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे.

मित्रांनो आपण वरील सर्व 5- 6 बाबींचा विचार करावा. यासाठी आपणासमोर काही पर्याय देत आहे. 1) फटाक्यांच्या ऐवजी आपण छान छान विज्ञानाची खेळणी, कथा – कहाणी किंवा थोर महापुरुषांची पुस्तके घ्यावीत, मित्रांना ती भेट म्हणून देण्यास हरकत नाही. तसेच आता आपण दिवाळीचा आनंद , मिठाई, भेटवस्तू , खेळणी , आवडीची पुस्तके घेऊन साजरा करणार की सभोवतालच्या वातावरणात प्रदुषण वाढवून करणार …? बदलाची सुरुवात स्वतःपासूनच करुया. अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगुया. पृथ्वीच्या तापमानाची वाढ थांबवुया. प्रदुषण मुक्त दिवाळी म्हणजेच इको फ्रेन्डली दिवाळी साजरी करुया.

यासंदर्भात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे काही ठिकाणी फटाक्यांच्या स्टाॕलजवळ सर्व प्रकारच्या पुस्तकांचे स्टाॕल विक्रीसाठी लावले जातात आणि त्याला आतापर्यंत चांगला प्रतिसाद नागरीकांकडून मिळत आहे. पुस्तकातून विद्यार्थ्यांना ज्ञान व प्रबोधनात्मक मनोरंजन सुद्धा होते. 2 ) दीपावलीच्या कालावधीत फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदुषणाची जाणीव महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीला जवळपास 16 -17 वर्षांपासून झाली. अनेक वर्षांपासून फटाके विरोधी अभियान राबविले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजात व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून दरवर्षी फटाक्यांची कमी खरेदी करुन बचत रकमेतून पुस्तके, खेळणी किंवा किल्ला बांधणी साहित्य तसेच अन्य खरेदी करेल, पर्यावरण रक्षण करण्यासाठी मी मनापासून संकल्प करीत आहे. असे संकल्प पत्र शाळेमार्फत भरुन घेतले जाते. राज्यात आतापर्यंत 35 ते 40 कोटी रुपयांची बचत झाल्याचे संकल्प पत्रावरुन लक्षात येते.

जाता जाता दिवाळी ही कविता सादर करीत आहे.

!! दिवाळी !!            

कधी काळी दिवाळीला, पणत्यांचे दिवे लागायचे ! आनंदाने गणगोत एकमेकांना भेटायचे !!
मातीच्या पणत्या जावून आता, विजेचा झगमगाट आला !
आता घराघरातल्या पदार्थांना हाॕटेलचा घमघमाट आला !!
आता भेटीगाठी ऐवजी एसएमएस पाठवितात ! आणि घरी बसूनच एकमेकांना आठवतात !!
कधी काळी दिवाळी आठवून हृदयी मना वाटते ! मात्र वाढता खर्च बघून दिवाळी सजा वाटते !!

  • सुरेश चुनिलाल थोरात, धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.