माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी न्यायालयासमोर शरणागती पत्करली तर इस्लामाबाद पोलिसांकरवी त्यांची अटक टाळली जाईल, असे इस्लामाबाद सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितले आहे. तोशाखाना भ्रष्टाचारप्रकरणी इम्रान खान यांच्याविरोधात २८ फेब्रुवारीला अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. मात्र ते आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
आपल्याविरोधातील अटक वॉरंट रद्द करावे यासाठी त्यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडे अर्ज केला होता, त्यावर उच्च न्यायालयाने त्यांना १३ मार्चपर्यंत सत्र न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, ते अजून न्यायालयासमोर हजर राहिलेले नाहीत. जिल्हा न्यायालयाने पोलिसांना इम्रान खान यांना अटक करण्यासाठी नव्याने १८ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. इम्रान खान यांनी न्यायालयात यायला हवे. ते का येत नाहीत? काय कारण आहे? त्यांनी पोलिसांना सहकार्य करायला हवे, त्यांना प्रतिकार करता कामा नये, असे न्यायाधीशांनी इम्रान खान यांचे वकील ख्वाज हारिस यांना सुनावले. कायद्याच्या दृष्टीने इम्रान खान यांना थेट न्यायालयात आणायला हवे होते, त्यांना न्यायालयात कोणीही त्रास दिला नसता, असे न्यायाधीश म्हणाले.
लाहोर उच्च न्यायालयाचे तेहरिकच्या सभेवर प्रतिबंध
गेल्या काही दिवसांमध्ये सुरक्षा कर्मचारी आणि इम्रान खान यांचे समर्थक यांच्यादरम्यान होत असलेला संघर्ष पाहता, लाहोर उच्च न्यायालयाने लाहोरमधील मिनार-ए-पाकिस्तान या ठिकाणी सभा घेण्यास मनाई केली आहे. या चकमकींमुळे जगभरात पाकिस्तानची प्रतिमा मलिन झाली आहे, असे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले. मिनार-ए-पाकिस्तान येथे १९ मार्चला जाहीर सभा घेण्याचे इम्रान खान यांनी गुरुवारी जाहीर केले, त्यानंतर न्यायालयाने त्यावर प्रतिबंध घातले.
आणखी एक एफआयआर
इम्रान खान यांच्या समर्थकांच्या सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांशी चकमकी झडल्यानंतरगुरुवारी पंजाब पोलिसांनी खान यांच्याविरुद्ध दहशतवादासह अनेक आरोपांखाली प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. इम्रान खान यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना खान यांनी भडकावले, असा आरोप आहे.