नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी चक्क हजारांच्या खाली आली असून, सध्या जिल्ह्यात 917 रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका कमी झाला असून, तूर्तात तरी दिलासा मिळाला आहे. मात्र डेंग्यू, चिकन गुन्याचे रुग्ण वाढले.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 3 लाख 98 हजार 611 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 917 रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 89 ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 626 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 42, बागलाण 19, चांदवड 24, देवळा 29, दिंडोरी 30, इगतपुरी 8, कळवण 8, मालेगाव 13, नांदगाव 12, निफाड 126, पेठ 1, सिन्नर 227, त्र्यंबकेश्वर 5, येवला 84 अशा एकूण ६२८ पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २५९, मालेगांव महापालिका क्षेत्रात 19 तर जिल्ह्याबाहेरील 11 रुग्ण असून एकूण 917 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 8 हजार 154 रुग्ण आढळून आले आहेत.
नाशिकमध्ये चिकुन गुन्याचे रुग्ण वाढले आहेत. सध्या सातशेहून अधिक चिकुन गुन्याचे रुग्ण आहेत. सप्टेंबर महिन्याच्या 14 तारखेपर्यंत शहरात डेंग्यूचे 140 नवे रुग्ण सापडले आहेत, तर चिकुन गुन्याचे 95 नवे रुग्ण सापडले आहेत. ऑगस्ट महिन्यात 311 डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. तर चिकुन गुन्याचे 210 रुग्ण सापडले होते. नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. कधी भुरभुर पाऊस सुरू असतो. तर कधी सरीवर सरी बरसत असतात. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये डासांची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे डेंग्यूची साथ पसरली आहे.
नाशिकमध्ये 2017 मध्ये डेंग्यूचे 151 रुग्ण होते, तर चिकुन गुन्याचे 4 रुग्ण होते. 2018 मध्ये डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा 368 वर गेला होता, तर चिकुन गुन्याचे 40 रुग्ण सापडले होते. 2019 मध्ये डेंग्यूचे रुग्ण 177 होते. या वर्षी चिकुन गुन्याच्या रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी होते. फक्त 1 रुग्ण सापडला होता. 2020 मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 115 होती, तर चिकुन गुन्याच्या रुग्णांची संख्या 7 होती. मात्र, 2021 डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसते. सध्या शहरात डेंग्यू आणि चिकुन गुन्याचे रुग्ण हजारोंच्या घरात असल्याचे समजते.