बिहारमध्ये नितीन कुमार यांनी आरजेडीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलेले आहे. भाजपाशी मध्येच काडीमोड घेत त्यांनी आरजेडीसोबत सत्ता स्थापन केली. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या युतीवर संकट आले आहे. बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानस आणि मनुस्मृतीवर केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद अजूनही क्षमलेला नाही. या वादाचे रुपांतर आता दोन्ही पक्षांमध्ये कटुता निर्माण करणारे कारण ठरत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सरकारची एक बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला त्यांनी आरजेडीच्या मत्र्यांना निमंत्रित केले नाही. त्यामुळे बिहार सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (RJD) या पक्षाचे नेते आणि बिहारचे शालेय शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी नालंदा मुक्त विद्यापीठाच्या १५ व्या दीक्षांत समारंभास ११ जानेवारी रोजी हजेरी लावली होती. या कार्यक्रमादम्यान बोलताना त्यांनी रामचरितमानस आणि मनुस्मृतीवर भाष्य केले. रामचरितमानस आणि मनुस्मृती समाजात फूट पाडतात, असे चंद्रशेखर म्हणाले. या वक्तव्यानंतर चंद्रशेखर यांनी माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (JDU) पक्षातर्फे करण्यात आली आहे. तर आरजेडीने मात्र चंद्रशेखर यांची पाठराखण केली आहे.
नितीश कुमार यांनी सोमवारी धान खरेदीसाठी सरकारची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीला कृषी मंत्री कुमार सर्वजीत आणि सहकार मंत्री सुरेंद्र प्रसाद यादव यांना आमंत्रित करणे अपेक्षित होते. मात्र नितीश कुमार यांनी दोन्ही मंत्र्यांना बैठकीला बोलावले नाही. खरंतर हे दोन्ही विभाग धान खरेदीशी संबंधित आहेत. या दोन्ही खात्याच्या सचिवांना पाचारण करण्यात आले होते, पण खात्याच्या मंत्र्यांना निमंत्रित न केल्याने आरजेडी पक्षात नाराजीचा सूर उमटत आहे.