कोरोना संकटाच्या काळात कडक लॉकडाऊन आणि निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. अनेकांना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सतावू लागला होता. त्यामुळे गरजू लोकांसाठी राज्य सरकारनं शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. मागील काही महिन्यांपासून गरजू लोक या मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेत होते. मात्र, आता कोरोना निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत. त्यामुळे मोफत शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तसं परिपत्रकच राज्य सरकारकडून जारी करण्यात आलं आहे.
राज्य सरकारनं मोफत शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता शिवभोजन थाळीसाठी 1 ऑक्टोबरपासून 10 रुपये मोजावे लागणार आहेत. तशी माहिती शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी दिलीय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारनं पहिल्यांना 14 मे 2021, पुढे 17 जून 2021 आणि 30 जून 2021 अशी तीन वेळा मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आता 14 सप्टेंबर रोजीही एकदा मुदतवाढ देण्यात आली होती.
शिवभोजन थाळी केंद्र चालकांना सरकारकडून थाळीमागे प्रत्येकी 40 रुपये अनुदान मिळते. तर 10 रुपये ग्राहकाकडून मिळतात. हे अनुदान पुरवठा विभागाकडून केंद्र चालकाच्या बँक खात्यात दर 15 दिवसांनी जमा केले जातात, असंही ढोले यांनी यावेळी सांगितलं.
राज्यातील ब्रेक द चेन अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केलं होतं. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांसाठी मोफत शिवभोजन थाळीची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. मर्यादित कालावधीपर्यंत शिवभोजन थाळी मोफत देण्याचं ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील अनेक लोकांपर्यंत मोफत शिवभोजन थाळी पोहोचली आहे. पण आता ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळी मोफत सुविधा देखील बंद केली जाणार आहे. 1ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळीसाठी 10 रुपये मोजावे लागणार आहे. त्याचबरोबर पार्सल देखील ऑक्टोबर महिन्यापासून बंद केले जाणार आहे.