आज दि.२४ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

३७० हटवल्यानंतर १४ नेत्यांसोबत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक

जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील ८ प्रमुख राजकीय पक्षांच्या १४ नेत्यांसोबत चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काश्मिरी नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली जात आहे, हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. सर्वपक्षीय बैठकीत माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित आहेत.

रिलायन्स जिओची 5G नेटवर्कशी
संबंधित तयारी पूर्ण

रिलायन्स जिओ 44th Reliance AGM मध्ये 5G सेवा सुरू करण्याबाबत घोषणा करणार असल्याचा अंदाज बांधण्यात येत होता. दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 5G वरून पडदा उठविला गेला आहे. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी व्हर्चुअल परिषदेच्या माध्यमातून घोषणा केली. कंपनीने 5G चाचण्यांमध्ये 1Gbps वेग प्राप्त केला आहे. 5G नेटवर्कशी संबंधित तयारी पूर्ण झाली असल्याचे कंपनीने म्हटले होते.

मोदींवर आता झोला
घेऊन निघायची वेळ

उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुका सध्या चर्चेचा विषय बनला आहे. याच विषयावर एका वाहिनीने घेतलेल्या चर्चासत्रादरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. आता मोदींवर आता झोला घेऊन निघायची वेळ आली आहे, असंही त्या म्हणाल्या. उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असेल असा प्रश्न या चर्चेदरम्यान विचारला असता त्यावर काँग्रेस प्रवक्त्या रागिणी नायक यांनी उत्तर दिलं.

मुलांच्या सुरक्षेसाठी योग्य
पावले उचलण्याची गरज

देशात करोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेता मोठ्या प्रमाणात तयारी करण्यासोबत विशेषतः मुलांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलण्याची गरज आहे असे सोनिया गांधी म्हणाल्या. सोनिया गांधी यांनी गुरुवारी पक्षाचे सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी यांच्यासोबत करोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली.

हप्ता घेणारा एजंट घऱाबाहेर
बसून राहत असल्याने आत्महत्या

जोपर्यंत हप्ता मिळत तोपर्यंत एजंट घऱाबाहेरच बसून राहत असल्याने पीडित व्यक्तीला अपमानित झाल्यासारखं वाटत होतं. अखेर प्लंबर म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालमधील मुर्शीबाद येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. साधन सिन्हा असं या ४० वर्षीय पीडित व्यक्तीचं नाव असून त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. त्यांची मुलं अद्याप अल्पवयीन आहेत.

आंध्र प्रदेश सरकारलाच परीक्षा
घेण्याची इच्छा का आहे ?

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने आंध्र प्रदेश सरकारच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं. “जर देशातील इतर बोर्डांनी आपापल्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे तर आंध्र प्रदेश सरकारलाच परीक्षा घेण्याची इच्छा? करोनाचे नवीन आणि अधिक घातक व्हेरिएंट्स समोर आले असून त्याचे रुग्ण देखील सापडत असताना राज्य सरकारला बारावीच्या परीक्षा का घ्यायची गरज पडते आहे?”, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे.

सरकारच्या विरोधात २६ जून रोजी
राज्यात चक्का जाम आंदोलन

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ‘ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभारा विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे २६ जून रोजी राज्यात एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे,’ अशी माहिती मुंडे यांनी दिली.

रिलायन्स आणणार
JioPhone Next स्वस्त फोन

रिलायन्सने नव्या फोनची किंमत जाहीर केली नसली, तरी हा फोन या वर्षी १० सप्टेंबर रोजी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी लाँच केला जाईल, असं मुकेश अंबानी यांनी यावेळी जाहीर केलं. त्यामुळे लवकरच देशाला टूजी मुक्त करता येणं शक्य होणार असल्याचं मुकेश अंबानी यावेळी म्हणाले. येत्या काही दिवसांत या फोनची किंमत देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये व्हॉइस असिस्टन्स, ऑटोमॅटिक रीड अलाऊड, स्मार्ट कॅमेरा असे फीचर्स असणार आहेत. JioPhone Next आधी भारतात लाँच केला जाईल आणि नंतर जगभरातल्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे.

अतिदक्षता विभागातील
रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडले

घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागातील रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. श्रीनिवास यल्लप्पा असं या रुग्णाचं नाव असून त्याचा आज मृत्यू झाला. पण मृत्युचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. श्रीनिवास यल्लपा या २४ वर्षीय रुग्णाला श्वसनाचा त्रास होत असल्याने दोन दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

महाबळेश्वर स्थित गुहांमध्ये
निपाह व्हायरस आढळला

महाराष्‍ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर स्थित गुहांमध्ये निपाह व्हायरस आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. महाबळेश्वरला महाराष्ट्रातील काश्मीर म्हटलं जातं. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. 2020 मध्ये पुण्याच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीने महाबळेश्‍वरच्या गुहांमधून वटवागुळांची लाळीचे नमुने घेतले होते. ज्यामध्ये निपाह व्हायरस असल्याची पुष्टी झाली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच निपाह व्हायरस मिळाला आहे.

100 वर्षाच्या दानशूर लोकांच्या
यादीत टाटा गृप आघाडीवर

टाटा कुटूंबाच्या दानशूरतेच्या अनेक कहान्या आपण ऐकल्या असतील. कोरोना संकटाच्या काळात देखील रतन टाटा यांनी भारतीयांना भरभरून मदत केली आहे. त्यांमुळे त्यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. टाटा परिवाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. गेल्या 100 वर्षाच्या दानशूर लोकांच्या यादीत टाटा गृपचे संस्थापक जमशेदजी टाटा यांना प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. एडेल गिव्ह हूरुनतर्फे ही यादी जारी करण्यात आली आहे.

आशा सेविकांना
1500 रुपयांची वाढ

राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना 1 जुलै 2021 पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता असे 1500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय झालाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (23 जून) मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केला. ‘आशां’ना विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेअंती आशा आणि गटप्रवर्तकांचा संप मागे घेत असल्याची घोषणा कृती समितीचे अध्यक्ष एम.के. पाटील यांनी केली.

दहावीत ९० टक्के गुण मिळविलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मिळणार दोन लाखाचे अनुदान

अनुसूचित जातीतील दहावीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.