बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याक्षणी त्यांची प्रकृती चांगली आहे. रणधीर यांच्या कर्मचारी वर्गातील 5 सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांनाही या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दरम्यान रणधीर यांनी आता एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, ते ज्या ठिकाणी मोठे झाले, ते त्यांचे वडिलोपार्जित चेंबूरचे घर लवकरच विकण्यात येणार आहे. रणधीर यांना यामागचे कारण विचारले असता ते म्हणाले की, भाऊ राजीव यांच्या मृत्यूनंतर मला एकटे वाटत आहे आणि आता त्यांना कुटुंबासमवेत राहायचे आहे .
रणधीर म्हणाले, ‘राजीव बहुतेक वेळ माझ्याबरोबरच राहत असे. त्याचे पुण्यात एक घर होते, परंतु तो येथे बरेच दिवस मुंबईत राहत होता. राजीवच्या मृत्यूनंतर मला एकटेपणा जाणवत होता, म्हणून मला वाटले की आता मी माझ्या कुटूंबाच्या जवळ असावे.’
दिवंगत राजीव कपूर यांच्या मालमत्तेवरील हक्कासाठी दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी देखील झाली आहे.