15 ऑगस्टला देशभरात 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. हा दिवस स्वातंत्र्याच्या नावाने समर्पित करण्यात आला आहे. कारण, या दिवशी भारताला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्तता मिळाली. यंदा स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष असल्याने घरोघरी तिरंगा मोहीम राबवण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एका सामाजिक कार्यकर्त्याने त्याच्या उजव्या डोळ्यामध्येच भारतीय तिरंगा ध्वज रंगवला आहे.
कोईम्बतूरचा रहिवासी असलेल्या ह्या व्यक्तीने डोळ्यात राष्ट्रध्वज रंगवला जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ह्या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. लोकांमध्ये देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचा एक भाग म्हणून सर्व देशवासियांना घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना 2 ते 15 ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्य दिनापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांचे डिपी बदलून राष्ट्रध्वज ठेवण्यास सांगितले आहे.
कसा रेखाटला राष्ट्रध्वज?
यामध्ये कोईम्बतूर जिल्ह्यातील कुनियामुथूर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि लघुचित्रकार युएमटी राजा यांनी भारतीय ध्वजाच्या रंगात डोळा रंगवण्यास सुरुवात केली. हे करण्यासाठी आधी त्याने अंड्याच्या कवचातील पांढऱ्या भ्रूणावरील अत्यंत पातळ फिल्मवर राष्ट्रध्वजाचे लघुचित्र रेखाटले. नंतर ते डोळ्यावरील पांढऱ्या बुबळावर चिकटवले. या पेंटींगसाठी तासभर त्याने काम केलं.
राष्ट्रध्वजाविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांनी डोळ्यामध्ये ध्वज रंगवला असल्याचं त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत सांगितले आहे. विशेष म्हणजे युएमटी राजा यांनी त्यांच्या कृतीचं अनुकरण न करण्याचा सल्ला दिला आहे. कारण वैद्यकीय तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की अशा कृतींमुळे डोळ्यात ऍलर्जी आणि खाज सुटते. यामुळे संसर्गाचा धोकाही आहे. त्यामुळे अशा गोष्टी करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.