मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण दोऱ्या कुणाकडे? शिवसेनेचा शिंदेंना सवाल

क्रांती दिनाचा मुहूर्त शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी निवडला गेला. आता काही लोक बेइमानी, विश्वासघातालाच ‘क्रांती’ म्हणत असतील तर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आपापल्या दालनात लखोबा लोखंडेच्या तसबिरीच लावाव्यात. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. त्यांची औटघटकेची मंत्रिपदे त्यांनाच लखलाभ ठरोत. मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत? असं म्हणत शिवसेनेनं मंत्रिमंडळ विस्तारावरून एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना टोला लगावला.

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली असून मुक्काम तुर्तास आर्थर रोड जेलमध्ये आहे. मात्र, तरीसुद्धा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून अग्रलेख प्रकाशित होत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा समाचार घेतला आहे.

‘अखेर 40 दिवसांनंतर शिंदे-फडणवीसांचे सरकार बाळंत झाल्याचे पेढे वाटण्यात आले, पण पाळण्यात नक्की काय आहे? ते समजायला मार्ग नाही. भाजप व शिंदे गट मिळून 18 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मंत्र्यांना शपथ देताना राज्यपाल महोदयांचा चेहरा आनंदाने न्हाऊन निघाला होता. फार मोठे ईश्वरी कार्य आपल्या हातून पार पडल्याचा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता, पण राज्यपाल महोदयांनी 40 दिवसांपूर्वी एका बेकायदा सरकारला शपथ दिली व आता त्याच बेकायदा सरकारच्या मंत्र्यांना शपथ देऊन घटनेचा अपमान केला आहे. शिंदे व त्यांच्या गटावर पक्षांतर बंदी कायद्याच्या कारवाईची तलवार लटकते आहे. सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरू असताना त्यातील काही आमदारांना मंत्रिपदाची शपथ देणे हा लोकशाही व घटनेचा खून आहे, पण असे खुनी सध्या देशभरात मोकाट सोडून त्यांच्या माध्यमातून राज्य चालवले जात आहे, अशी टीका शिवसेनेनं केली.

मुळात शिंदे-फडणवीसांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर मंत्रिमंडळ विस्तारास इतका विलंब का लागला? आता ही परिस्थिती व घटनात्मक पेच कायम असताना या मंडळींनी शपथ घेतली. मग हीच शपथ त्यांनी आधी का घेतली नाही? फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते की, 15 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ निर्माण होईल. 12 ऑगस्टला आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टात ‘जजमेंट डे’ आहे. म्हणजे निकाल येईल व त्याआधी हा शपथविधी संपन्न होत आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची भीती नाही. सर्वकाही मनाप्रमाणे होईल, असा आत्मविश्वास फसफसून बाहेर पडला आहे. तो कशाच्या जोरावर? असा संशयही शिवसेनेनं व्यक्त केला.

‘राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावीत, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा अशा मंडळींनी भाजपकडून शपथा घेतल्या. शिंदे गटाकडून संदिपान भुमरे, संजय राठोड, दादा भुसे, गुलाब पाटील, तानाजी सावंत, उदय सामंत, शंभुराज देसाई, दीपक केसरकर अशांचे घोडे गंगेत न्हाले, पण गंगेत डुबकी मारून तरी यांच्या विश्वासघाताचे पाप धुतले जाईल काय? ज्यांच्या पाठीवर मंत्रिपदाची झुल पडली ते आनंदात असले तरी हा त्यांचा आनंद औटघटकेचाच ठरण्याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा विश्वासघाताची उडी मारूनही ज्यांना मंत्रिपदे मिळाली नाहीत त्यांचे समाधान कसे करणार? असा सवालही सेनेनं केला.

स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांची तरी काय प्रतिष्ठा राहिली आहे? महिनाभरात त्यांना दिल्लीत सात हेलपाटे मारावे लागले तेव्हा कोठे काल मंत्रिमंडळाचा विस्तार ते करू शकले. शिंदे दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीत गेले. बैठक संपल्यावर ‘टीम इंडिया’चा म्हणून पंतप्रधानांबरोबर सामुदायिक फोटो प्रसिद्ध झाला, तो स्वाभिमानी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारा आहे. पंतप्रधान मोदींबरोबरच्या छायाचित्रात आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे हे तिसऱ्या रांगेत उभे आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीकाही सेनेनं केली.

महाराष्ट्रास तब्बल चाळीस दिवसांनी एक सरकार लाभले आहे व त्या सरकारकडून महाराष्ट्राला फार काही मिळेल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. मुळात या सरकारच्या चारित्र्य व प्रतिमेचाच घोटाळा आहे. किचकाने द्रौपदीचा विनयभंग केला, मांडीवर थाप मारून तो वारंवार पापाची भाषा बोलत होता. म्हणून भीमाने किचकाची मांडीच फोडली. फडणवीस यांच्या दोन्ही मांडय़ांवर पापाचीच ओझी शिंदे गटाने ठेवली आहेत व हे पाप महाराष्ट्राच्या माथी मारण्याचे कार्य मंत्रिमंडळ विस्ताराने पुढे नेले आहे, ही महाराष्ट्राची बदनामीच आहे. त्यांची औटघटकेची मंत्रिपदे त्यांनाच लखलाभ ठरोत. मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत? असा सवालही सेनेनं केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.