लॉकडाऊन उठल्यानंतर रेल्वेच्या उत्पन्नात 113 टक्क्यांची वाढ

देशभरातील लॉकडाऊन उठल्यानंतर रेल्वेने 2021-2022 च्या दुसऱ्या तिमाहीत प्रवासी विभागाच्या उत्पन्नात 113 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कोरोना लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे 2020-21 दरम्यान रेल्वेची कमाई कमी झाली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान त्याच्या सर्व नियमित सेवा वर्षाच्या बहुतेक काळासाठी तात्पुरत्या निलंबित करण्यात आल्या होत्या. आता त्या हळूहळू पूर्वपदावर येत आहेत.

आतापर्यंत रेल्वेने कोविडच्या आधी कार्यरत असलेल्या 96 टक्के गाड्या पूर्ववत केल्या आहेत. रेल्वेचे म्हणणे आहे की जसजशी परिस्थिती सुधारेल तसतसे गाड्यांचे संचालन आणखी वाढवले ​​जाईल. रेल्वे सध्या प्रवाशांसाठी विशेष गाड्या चालवत आहे आणि नियमित फेऱ्या सुरू करण्यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत रेल्वेने प्रवासी भाड्यातून 4,921.11 कोटी रुपये कमावले. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या तिमाहीत, रेल्वेची कमाई 10,513.07 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत अनेक टक्के वाढ झाली आहे. लॉकडाऊनचे निर्बंध दूर झाल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यानुसार गाड्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. येत्या काळात आणखी वाढ दिसून येईल.

कोरोना संकटाच्या काळात प्रवासी वाहतूक बराच काळ बंद असूनही रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून उत्पन्नाची भरपाई केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या मालवाहतुकीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे सध्या रेल्वेला ‘अच्छे दिन’ आले आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये रेल्वेचे मालवाहतूक लोडिंग गेल्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा 3.62 टक्के जास्त होते. रेल्वेने ही माहिती दिली आहे.

सप्टेंबर महिन्यात रेल्वेने 106 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. गेल्यावर्षी याच कालावधीत हे प्रमाण 102.3 दशलक्ष टन होते. त्यामुळे यंदा यामध्ये 3.62 टक्क्यांची भर पडली आहे. मालवाहतूक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून संबंधित ग्राहकांना अनेक सवलती देखील दिल्या जात आहेत. या कालावधीत, भारतीय रेल्वेने मालवाहतुकीतून 10,815.73 कोटी रुपयांची कमाई केली. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.19 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी गेल्यावर्षी याच कालावधीत रेल्वेला मालवाहतूक करुन 9,905.69 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच एसी कोचमधून चॉकलेटची वाहतूक करण्यात आली. देशात प्रथमच दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने हे काम केले आहे. या रेल्वे विभागात काही एसी डबे रिक्त होते, ज्याचा वापर चॉकलेट आणि इतर खाद्यपदार्थ वाहून नेण्यासाठी करण्यात आला. चॉकलेट आणि इतर मालाच्या वाहतुकीत तापमानाची पातळी नियंत्रित करावी लागते. त्यामुळे या मालाची वाहतूक एसी कोचमध्ये होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.