मतदान संपलं, टेन्शन वाढलं! वाढलेला टक्का कुणाला आशिर्वाद देणार?

पुण्यातील बहुचर्चित कसबा पेठ पोटनिवडणुकीचं मतदान रविवारी पार पडलं. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडलं. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने अशी थेट लढत असलेल्या या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे मतदान संपलं असलं तरी उमेदवारांचं टेन्शन वाढल्याचं चित्र आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत अचानक मतदान वाढल्यामुळे चुरस वाढली आहे, त्यामुळे भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पोटनिवडणूक असूनही कसब्याच्या निवडणुकीने राज्यातल्या दिग्गजांना प्रचारात उतरवलं. आरोप-प्रत्यारोप भावनिक राजकारण, अशा सगळ्याच डावपेचांचा आणि अगदी पैशांचाही या पोटनिवडणुकीत मुक्तहस्ते वापर झाल्याचं दिसलं. कदाचित म्हणूनच रविवारी सकाळच्या सत्रात काहीसा मंदावलेला मतदानाचा वेग दुपारनंतर चांगलाच वाढला आणि निवडणूक आपसूकच चुरशीच्या पॉईंटवर जाऊन पोहोचली.

महाविकासआघाडीने रवींद्र धंगेकरांचा जनसंपर्क आणि नेत्यांच्या प्रचारसभेद्वारे प्रचार केला. तर भाजपने मायक्रो लेव्हलला नियोजन करत निवडणूक बऱ्यापैकी आपल्या बाजूने खेचण्यात यश मिळवलं.

आता कसब्याच्या मतदारांचा कौल मतदान यंत्रात कैद झाला आहे. मतदार कुणाच्या मागे उभे राहिले हे अस्पष्ट असलं तरी दोन्ही उमेदवार विजय आपलाच असल्याचा दावा करत आहेत.

या निवडणुकीत भाजपने पोलीस प्रोटेक्शनमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप महाविकासआघाडीने केला आहे. तसे काही व्हिडिओदेखील व्हायरल करण्यात आले. तर भाजपने पुण्येश्वर मंदिर वाद आणि हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात आणत आपल्या हार्डकोर मतदाराला पुन्हा जागृत केलं आहे, त्यात शेवटच्या सत्रात वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याने कसब्याच्या पोटनिवडणुकीचा अंदाज बांधणं अवघड होऊन बसलं आहे, त्यामुळे दोन मार्चपर्यंत केवळ अंदाज वर्तवण्याशिवाय पर्याय नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.