बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कापडिया यांचा आज वाढदिवस

जन्म. ८ जून १९५७

डिंपल कापडियाचे वडिल चुन्नीभाई कपाडिया एक धनाढ्य व्यक्ती होते. चुन्नीभाई आपल्या ‘समुद्र महल’ या घरात मोठ मोठ्या पार्ट्या द्यायचे. या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या बड्या बड्या स्टार्सचा राबता असायचा. अशाच एका पार्टीत राजकुमार यांची नजर १३ वर्षांच्या डिंपलवर पडली. राजकुमार यांनी डिंपलला घेऊन चित्रपट काढण्याची इच्छा व्यक्त केली. चुन्नीभाईंनी काही वेळ मागून घेतला. अखेर तिच्या वयाच्या सोळाव्या वर्षी आणि १९७३ मध्ये राज कूपर यांच्या ‘बॉबी’ या चित्रपटात डिंपल झळकली. हा चित्रपट सुपरडुपर हिट राहिला. तिने बॉबी ब्रिगेंझा नावाच्या मध्यमवर्गीय अँग्लो इंडियन मुलीची भूमिका केली होती, ऋषीकपूरची प्रमुख भूमिका असणारा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात ती शॉर्ट स्कर्टमध्ये दिसली. मग काय लोक बोल्ड डिंपलच्या प्रेमात पडले.’बॉबी’ हा एक व्यावसायिकदृष्ट्या गाजलेला आणि टिकाकारांनी नावाजलेला चित्रपट होता. डिंपल कापडिया च्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार डिंपल कापडिया ला जया भादुरीसोबत ‘अभिमान’ चित्रपटासाठी विभागून दिला गेला. बॉबीच्या यशापाठोपाठ डिंपल कापडिया तरूण वर्गाची एक फॅशन आयकॉन बनली. यानंतर अनेक डायरेक्टर डिंपलला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सूक होते. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. ‘ बॉबी’ रिलीज होण्याआधीच डिंपलची ओळख राजेश खन्नांशी झाली. राजेश खन्ना डिंपलच्या प्रेमात आकंठ बुडाले. इतके की ‘बॉबी’ रिलीज होण्याआधीच त्यांनी डिंपलसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. डिंपलही राजेश खन्नाची ‘दिवानी’ होती. लग्नाचा प्रस्ताव ती नाकारू शकली नाही आणि डिंपलने स्वत:पेक्षा १५ वर्षे मोठ्या राजेश खन्नांशी लग्न केले.

खरे तर ‘ बॉबी’ हिट झाल्यावर डिंपलच्या घरासमोर दिग्दर्शकांची रांग लागली होती. पण राजेश खन्ना यांनी डिंपलला लग्नानंतर चित्रपटांत काम करण्यास मनाई केली होती. यामुळे डिंपलने बॉलिवूड व अभिनयापासून फारकत घेतली. राजेश खन्ना व डिंपल यांना दोन मुली झाल्या, पण १९८२ मध्ये डिंपल व राजेश खन्ना यांच्यात मतभेद निर्माण झाले. दोघेही विभक्त होण्यापर्यंत हे वाद विकोपाला गेले. १९८४ मध्ये राजेश खन्नापासून विभक्त झाल्यावर ती पुन्हा अभिनयाकडे वळली. यानंतर विश्वास बसणार नाही पण डिंपलने हिट चित्रपटांची रांग लावली. १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या रमेश सिप्पी यांच्या “सागर” मध्ये काम केले. सिप्पींच्या एका मित्राने डिंपल पुन्हा काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी तिला स्क्रिन टेस्टसाठी बोलावले आणि ती पुन्हा एकदा ऋषीकपूरसोबत रूपेरी पडद्यावर झळकली. १९८४ मध्ये आलेल्या ‘सागर’ चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पुढे डिंपलचा ‘जख्मी शेर’ हा चित्रपट आला. यांनर ‘ऐतबार’, ‘लावा’, ‘अर्जुन’, ‘सागर’, ‘पाताल भैरवी’, ‘जाबांज’, ‘इंसानियत का दुश्मन’, ‘काश’, ‘साजिश’, ‘राम लखन’ असे अनेक हिट चित्रपट तिने दिलेत. ‘काश’ , ‘द्रिष्टी’,‘लेकिन’ आणि‘रुदाली’ या समांतर सिनेमांमधील तिच्या भूमिकांसाठी तिची विशेष नोंद घेतली गेली. ‘रुदाली’साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समिक्षक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९३ मध्ये आलेल्या ‘गर्दिश’ मधील तिची सहाय्यक भूमिका लक्षणिय ठरली आणि ‘क्रांतीवीर’ मधील तिच्या भूमिकेसाठी तिला चौथा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

“दिल चाहता है” आणि अमेरिकन निर्मिती असणाऱ्या लीला चित्रपटात महत्वाच्या भूमिकेंमध्ये दिसली. त्यानंतर “हम कौन है”,”प्यार मे ट्विस्ट, “फिर कभी”, “तुम मिलो तो सही”, “बिईँग सायरस”,”लक बाय चान्स”,”दबंग”, “पटियाला हाऊस” आणि “कॉकटेल” मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली. डिंपल कपाडिया एक अशी अभिनेत्री आहे, जिने बॉलिवूडमध्ये बाप आणि मुलासोबत वेगवेगळ्या चित्रपटात हिरोईन म्हणून काम केले. होय, आधी डिंपल धर्मेन्द्र यांची हिरोईन बनली आणि यानंतर धर्मेन्द्र यांचा मुलगा सनी देओल याच्याशीही ती ऑनस्क्रीन रोमान्स करताना झळकली. सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या लव्ह अफेअरच्या बातम्या त्या काळात बऱ्याच गाजल्या होत्या. अर्थात दोघांनीही या चर्चा नाकारल्या. याचदरम्यान काही वर्षांनंतर डिंपल व राजेश खन्ना यांच्यातील दुरावाही हळू हळू कमी व्हायला लागला. डिंपलने राजकीय आखाड्यातही राजेश खन्ना यांना सोबत दिली. आजही डिंपल कपाडिया अद्यापही अभिनय करते आहे. पण सोबतच तिचा मेणबत्ती डिझाईनचा बिझनेस आहे. तिने डिझाईन केलेल्या मेणबत्त्या मोठ्या किमतीत विकल्या जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.