देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: दिल्ली आणि महाराष्ट्रात पूर्वीपेक्षा जास्त प्रकरणे समोर येत आहेत. त्यात IIT कनपूरचं असं म्हणणं आहे की, जुन महिन्यात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते. ज्यामुळे आता लोकांमध्ये पुन्हा एकदा भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यात आता चालू आयपीएल 2022 मध्येही कोरोनाचे एक प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे पुन्हा एकदा संपूर्ण लीग धोक्यात आली आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोविड-19 तपासणीत पॉझिटिव्ह आले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांच्या हेल्थबाबात माहिती देणाऱ्या निवेदनात म्हटले आहे की, ‘दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले आहे. दिल्ली कॅपिटल्सचे वैद्यकीय पथक यावेळी त्यांची काळजी घेत आहे.’
गेल्या वर्षी देखील आयपीएलवर कोरोनाचं सावट होतं, ज्यामध्ये सगळ्याच खेळाडूंना बायोबबलमध्ये ठेवण्यात आलं होतं. परंतु तरी देखील खेळाडू पॉझिटीव्ह आढळून आले, ज्यामुळे ती लीग थांबवावी लागली होती.
त्यात आता दिल्ली टीमचे फिजिओ यांना कोरानाची लागण झाल्यामुळे, सर्वच खेळाडूंसाठी कोरोनाचा धोका वाढला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी 2 एप्रिलला टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राला कोरोना झाला होता. आकाशने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली होती.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी कोरोना नियम शिथिल केले. त्यामुळे 6 एप्रिलपासून स्टेडियममध्ये 50 टक्के लोकांना उपस्थिती राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नवा कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने अप्रतिम कामगिरी केली आहे. या हंगामातही दिल्लीने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 हरले आहेत आणि फक्त 2 सामने जिंकले आहेत.