आज दि.१४ जानेवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

म्यानमार सैन्याकडून भारतविरोधी कारवाया
करणाऱ्या गटांविरोधात मोठी कारवाई

म्यानमार सैन्याकडून त्यांच्या जमिनीवरुन भारतविरोधी बंडखोर कारवाया करणाऱ्या गटांविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. सरकारमधील सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, “म्यानमारमध्ये छावणी उभारुन भारतविरोधी कारवाया करणाऱ्या बंडखोर गटांवर म्यानमारच्या लष्कराने सुरक्षा यंत्रणांनी कारवाई केली आहे”. दरम्यान भारतीय यंत्रणाही म्यानमारमधील सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात आहेत. “काही दिवसांपूर्वी पिपल्स लिबरेशन आर्मीकडून (PLA) आसाम रायफल्सचे कर्नल आणि त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे PLA तसंच यासारख्या दहशतवादी गटांवर कारवाई करण्यासाठी भारतीय यंत्रणा म्यानमारमधील यंत्रणांच्या संपर्कात आहेत,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

अनेक ठिकाणी नागरिक लस
घेण्यास टाळाटाळ : राजेश टोपे

राज्यातील करोना संसर्ग एकीकडे झपाट्याने वाढत असताना, अद्यापही अनेक ठिकाणी नागरिक लस घेण्यास टाळाटाळ करताना दिसून येत आहे. सरकारकडून १०० टक्के लसीकरणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र नागरिकांनी देखील यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण ऐच्छिक केल्यानं अनेकजण लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं म्हटलं आहे.

सरनाईक यांना पाठवलेली ४ कोटी
३३ लाख ९७ हजारांची नोटीस रद्द

ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक एक येथे उभारलेल्या ‘छाबय्या विहंग गार्डन’ या गृहसंकुलातील अनधिकृत बांधकामासाठी ठाणे पालिकेने ठोठावलेला दंड व त्यावरील व्याज वित्त विभागाचा विरोध डावलून माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे सरनाईक यांना पाठवलेली ४ कोटी ३३ लाख ९७ हजारांची नोटीस रद्द होणार आहे. दरम्यान या मुद्द्यावरुन विरोधक टीका करत असून वाद निर्माण झाला आहे. यानंतर पहिल्यांदाच प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

तिकीट मिळालं नाही, म्हणून
ओक्साबोक्शी रडला उमेदवार

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सर्वाधिक चर्चा ही उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांची होत आहे. या राज्याचं राजकीय महत्त्व हे त्यामागचं एक कारण असलं, तरी इथे घडणाऱ्या अजब घटनांमुळे देखील उत्तर प्रदेशची निवडणूक चर्चेत आली आहे. भाजपाचे एक उमेदवार प्रचार करण्यासाठी थेट आंघोळ करणाऱ्या माणसासमोर जाऊन उभे ठाकले, तर दुसरीकडे आता बसपाच्या एका उमेदवारानं तिकीट मिळालं नाही, म्हणून थेट पोलीस स्थानक गाठत ओक्साबोक्शी रडायला सुरुवात केली. वर आत्महत्येची धमकी देखील दिली!

‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून
अभिनेते किरण माने यांना काढले

स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमधून अभिनेते किरण माने यांना काढून टाकण्यात आलंय. राजकीय भूमिका घेत असल्याचं विचित्र कारण देत ही कारवाई करण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहे. मात्र असं असतानाच आता खुद्द किरण माने यांनी फोनवर नक्की त्यांना काय सांगण्यात आलं. हा निर्णय का घेण्यात आला यासंदर्भातील महत्वाचा खुलासा केलाय.

नांदेड जिल्ह्यात गारा कोसळल्याने
शेतपिकाचं नुकसान

नांदेड जिल्ह्यातील हे महसूल मंडळ असून या भागातल्या बापशेटवाडी, मांजरी, सतनूर, हिपळनार, कदनूर, माकणी या गावांमध्ये गारपिट झाली. शुक्रवारी सकाळी ६.३०-७ च्या सुमारास ढगांचा गडगडाट झाल्यानंतर अचानक गारा कोसळू लागल्या. मोठमोठ्या आकाराच्या या गारा कोसळल्यामुळे शेतपिकाचं मोठं नुकसान झालं. करडी, कांदा, ज्वारी, पेरूच्या बागांचंही मोठं नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

दक्षिण आफ्रिका यांच्यात
तिसरी निर्णायक कसोटी

केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरी आणि निर्णायक कसोटी सुरू आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिका संघ मजबूत स्थितीत असून विजयाच्या उंबरठ्यावर आहे. दक्षिण अफ्रिकेने ३ गडी गमवून २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. पहिल्या डावात भारताने सर्व गडी गमवून २२३ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिकन संघाने सर्वबाद २१० धावा केल्या. भारताला १३ धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसऱ्या डावात १९८ धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेसमोर २१२ धावांचं आव्हान ठेवलं आहे. तीन सामन्यापैकी भारत आणि दक्षिण आफ्रिकेने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.

कृषी विद्यापीठातून दुग्धजन्य
पदार्थ निर्मितीचे धडे देणार

शेतीला सर्वात मोठा जोडधंदा म्हणून दुग्ध क्षेत्राकडे पाहिले जात आहे. मात्र, योग्य नियोजन आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मितीची माहीती अनेकांना नसल्यामुळे पाहिजे तसा विस्तार अद्यापही झालेला नाही. दूध उत्पादनात वाढ झाली पण त्या तुलनेत दरात सुधारणा झाली नाही. हाच धागा पकडून आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे धडे दिले जाणार असल्याचे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 50 लाख रुपये खर्चून प्रशस्त असे प्रशिक्षण केंद्रही उभारले जाणार असल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सागितले आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचाही अभ्यास
केला जाणार, डिप्लोमा कोर्स

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, औरंगाबाद आणि मर्सिडिज बेंझ यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमात इलेक्ट्रिक वाहनांचा विषयही घेता येण्याची संधी मिळणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात यावर्षीपासून ‘अॕडव्हान्स्ड डिप्लोमा इन ऑटोमोटिव्ह मेक्ट्रॉनिक्स’ या पदविका अभ्यासक्रमात इलेक्ट्रिकल वाहनांचा समावेश करण्यात आला आहे.

मालविका बनसोडने मिळवला
सायना नेहवालवर शानदार विजय

भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात (13 जानेवारी) मोठा उलटफेर पाहायला मिळाला. नागपूरच्या 20 वर्षीय मालविका बनसोडने ऑल्मिपिक मेडल विजेत्या सायना नेहवालवर शानदार विजय मिळवला. या विजयासह मालविकाने ऐतिहासिक कामगिरी केली. या सामन्याचं दिल्लीतील केडी जाधव इनडोअर स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं होतं.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.