कोण कितीही जवळ आले आणि दुरावले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे नाव अजूनही चमकत आहे. शरद पवार यांची आठवण कायम राष्ट्रवादीचा तिरस्कार करणारे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलीयं. जळगावात आज एका कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर एकत्र आलेल्या शरद पवार, एकनाथ खडसे यांची मंत्री गुलाबराव पाटील यांनी फिरकी घेतली.
गुलाबराव पाटील म्हणाले, मी व्यक्तिगत राजकारणाला कधीच महत्व दिलं नाही. पण, विचारांच्या राजकारणाला कायम महत्व दिलं. विचाराचं राजकारण केलं यामुळेच आपण काम करू शकलो. मी नेहमी राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणार कार्यकर्ता. कायम राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढणारा मी माणूस. पण…
मी कायम राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो. माझं स्वतःचं कलंदर डोकं किती फिरतं ते मला माहित नाही. आयुष्यभर आम्ही ज्या पक्षावर टीका करत राहिलो. त्या पक्षाने काय जादू चालविली ते आम्हालाही समजेना. पण, काही काही माणसाचं डोकं जादूगारासारखं चालतं.
राष्ट्रवादीवर सातत्याने टीका केली. पण, मला काय माहित कि शरद पवार साहेबच मला मंत्री करणार आहेत. मला सकाळची शपथ समजली नाही, तर दुपारची कशी समजणार? सांगायचं अर्थ असा कि, काही काही माणसाचं डोकं जादूगारासारखं कसं चालतं?
रात्री बारा – साडेबाराला मंत्रीपदासाठी माझं नाव जाहीर झालं. तातडीनं मुंबईला आलो. सकाळी आनंदाने वर्तमानपत्र पाहिलं, तर वेगळाच फोटो होता. कार्यकर्त्यांनी विचारलं, त्यांना सांगितलं कि संग्रहित चित्र असेल. पण ते चित्र संग्रहित नव्हतं. डायरेक्ट काढलेला फोटो होता.
दहा, अकरा वाजेपर्यंत हॉटेलच्या खाली उतरण्याची हिंमत झाली नाही. उतरतं कोण? पण… पुन्हा पवार साहेबांची जादू चालली. गेलेले सगळे पुन्हा वापस येऊ लागले. ”या रे माझ्या बाळांनो… माझ्या पक्षांनो साद घातली.” काही जण आले, काही वेळाने सगळेच परत आले आणि योगायोगानं सरकार आलं. पवारसाहेब त्या वेळी मी भारावून गेलो… तुमचं नाव घेतलं तरी आता तुम्ही जादूगार असल्यासारखं वाटता..