यंदाच्या कडक उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली. परिणामी लोडशेडिंग सुरू झाल्यानं राज्यातील नागरिक हैराण झालेत. हे कमी झालं म्हणून की काय, आठवडाभरात महाराष्ट्र अंधारात बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्यात यंदा विजेची मागणी 20 टक्क्यानं वाढली आहे. तब्बल 2600 मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला असून वीज प्रकल्पांमध्ये केवळ 35 टक्के कोळसासाठा आहे. त्यातच परळी आणि भुसावळ वीज प्रकल्पात जेमतेम 1 दिवसाचा साठा आहे. तर कोराडी, नाशिक वीज प्रकल्पात फक्त 2 दिवसांचा, पारसमध्ये 5, खापरखेड्यात 6, तर चंद्रपुरात 7 दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे.
राज्यात कोळसा टंचाई मुळे वीज संकट उद्भवल्याचं ऊर्जा विभागानं स्पष्ट केलंय. मात्र वीज टंचाईमागच्या या कारणाबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भात महारष्ट्र स्टेट लोड dispach सेंटर च्या वेबसाईट वर माहिती देण्यात आलीय. त्यामध्ये केवळ कोळशा अभावी वीज निर्मिती बंद आहे, असं एकही केंद्र नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
गॅस उपलब्ध नसणे किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे या केंद्रांवरील वीज निर्मिती ठप्प असल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केला आहे. सुमारे 1841 मेगा वॉट वीजनिर्मिती क्षमता असलेले हे प्रकल्प कोळसा वगळता विविध कारणांनी बंद आहेत.
एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर हे वीजसंकट कोसळलं आहे. अजून दीड महिने उन्हाळ्याचे चटके नागरिकांना सहन करावे लागण्याची शक्यता आहे.