एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चार दिवसानंतर पहिली एसटी बस धावली आहे. मुंबई सेंट्रलमधून पहिली एसटी साताऱ्याच्या दिशेने रवाना झाली. तर 826 एसटी रस्त्यावर धावत असल्याचं एसटी प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे एसटी कामगारांच्या संपात फूट पडल्याचं चित्रं निर्माण झालं आहे.
राज्यातील काही भागात एसटी सेवा सुरू झाली आहे. मुंबई आगारातून आज दुपारी 2 वाजून 30 मिनिटाने एमएच 20 बीएल 3954 क्रमांकाची एसटी धावली. चालक आर. आर. देवरे आणि वाहक एस. एस. माने यांनी डेपोतून ही एसटी काढली. ही एसटी साताऱ्याच्या दिशेने निघाली होती. तर अक्कलकोट आगारातूनही काही बसेस सुटल्या. इस्लामपूर-वाटेगाव ही पहिली बस मार्गस्थ झाली. अक्कलकोट ते सोलापूर, सोलापूर ते अक्कलकोट अशा दोन ट्रीपही या बसच्या झाल्या. या एसटीतून 75 प्रवाशांनी प्रवास केला. तसेच रत्नागिरी विभागातील राजापूर आगारातून बुरुंबेवडी वस्ती हातदे ही एसटी रवाना झाली.
दरम्यान एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एसटी डेपोतून 826 बसेस निघाल्याचं सांगितलं. 27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. उच्च न्यायालय, औद्योगिक न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने नकार देऊनही संप सुरू आहे. खासगी वाहने आम्ही सुरू केली आहेत. कर्मचाऱ्यांनी कामावर यावं कोणी अडवणूक करू नये, असं आवाहन चन्ने यांनी केलं. आज 36 बसेस आम्ही विविध डेपोतून सोडल्या. 17 डेपोतून या बसेस सोडल्या. एकूण 900 लोकांनी एसटीतून प्रवास केला. खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी आम्ही एसटी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
मॅकेनिकल स्टॅफ कामावर यायला सुरुवात झाली आहे. 2 हजारपेक्षा जास्त कर्मचारी कामावर आले आहेत. महामंडळात 92 हजार 700 कर्मचारी आहे. महामंडळाला भरतीची गरज असेल तर ज्यांचे ट्रेनिंग पूर्ण झालं आहे त्यांना घेण्याचा विचार करू. पण अजून पर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. कर्मचाऱ्यांची मागणी उच्च न्यायालयासमोर विचाराधीन आहे. त्यावर समिती नेमली आहे. त्या वेळेनुसार ते ठरेल. डेपो सुरू करा असं आम्हाला कर्मचारीच सांगत आहेत. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आम्ही डेपो सुरू करतोय पण कर्मचाऱ्यांनी कामावर यावं अशी आमची विनंती आहे, असं ते म्हणाले.