आज दि.४ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

T20 World Cup Finals मध्ये IND vs PAK रंगणार… फक्त येत्या सामन्यात ‘हे’ समीकरण जुळायला हवं

यंदाच्या टी २० विश्वचषकातील जवळपास प्रत्येक सामन्यात वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळाले. जिंकता जिंकता सामना गमावणे ते हरलेल्या सामन्यातून खेचून विजय घेऊन येणे. खेळाडूंचे भन्नाट शॉट ते अशक्य वाटणाऱ्या विकेट्स, मोडलेले रेकॉर्ड्स आणि बरंच काही एकाच विश्वचषकात दिसून आलं. आतापर्यंतची विश्वचषकाचे खेळी पाहता आता सेमीफायनल व अंतिम सामन्यात काहीही घडू शकतं हे काही वेगळं सांगायला नको. टी २० वर्ल्ड कपचं सध्याचं पॉईंट टेबल पाहता येत्या सामन्यात जर काही समीकरणे जुळून आली तर पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तानचा थरार अनुभवता येईल अशी शक्यता आहे. भारत सध्या पॉईंट टेबलच्या टॉपला आहे तर पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेला हरवून आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.टी २० विश्वचषकात भारत व पाकिस्तान दोन्ही संघांसाठी रविवार म्हणजेच ६ ऑक्टोबर हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. ६ तारखेला भारत विरुद्ध झिम्बाम्बावे सामना रंगणार असून पाकिस्तान यादिवशी बांग्लादेशच्या विरुद्ध लढणार आहे तर दक्षिण आफ्रिका नेदरलँडच्या विरुद्ध सामना खेळणार आहे. या सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यास किंवा पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास पाकिस्तानच्या आशा पल्लवित होतील. या सामन्यात पाकिस्तानला बांग्लादेशला हरवणे गरजेचे आहे.
दुसरीकडे भारतासाठी टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित आहे. भारताच्या संघाने झिम्बाब्वेला पराभूत केल्यास ८ गुणांसह सेमीफायनलमध्ये पोहोचतील जर सामना पावसाने रद्द झाला तर ७ गुणांसह भारत उपांत्य फेरीत प्रवेश करेल.मात्र जर भारत झिम्बाम्बावेसमोर पराभूत झाला आणि दक्षिण आफ्रिका नेदरलँड समोर विजयी ठरली तर आफ्रिका सुद्धा ६ पॉइंट्ससह भारताच्या बरोबरीला येईल.दरम्यान, आज न्यूझीलंडने आयर्लंडवर ३५ धावांनी विजय मिळवत टी२० विश्वचषक २०२२ मध्ये उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. सेमीफायनल 1 मध्ये भारताची लढत न्यूझीलंडशी होणार हे जवळपास निश्चित आहे. जर सर्व समीकरणे जुळून आली तर उपांत्य फेरीत पाकिस्तानची लढत इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाशी होऊ शकते. सेमीफायनलमध्ये दोन्ही संघांचा विजय झाल्यास भारत व पाकिस्तान १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये आमने सामने येतील.

ऐन कार्तिकीलाही VIP Culture; शिंदे गटातील मंत्र्यामुळे पंढरीत वारकऱ्यांची दैना

आज कार्तिकी एकादशी आहे. त्यामुळे कृषीमंत्री अब्दुल सत्तारही पंढरपुरात आले होते. मात्र, एकीकडे एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी असताना दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा थेट मंदिरापर्यंत होता. त्यामुळे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्याचा सर्वसामान्य वारकऱ्यांना फटका बसला.
ऐन कार्तिकीच्या एकादशीच्या दिवशीही या व्हीआयपी कल्चरचा सर्वसामान्य वारकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. ऐन कार्तिकी एकादशीच्या दिवशी भरगर्दीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ताफा मंदिरापाशी आणल्याने यांच्या बेफिकीर पणाचा फटका सामान्य वारकऱ्यांना सहन करावा लागला. त्यामुळे राज्य सरकार पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी प्रयत्नशील आहे. असे असताना भविष्यात होणारा विकास नेमका कुणासाठी आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

एकीकडे कर्मचाऱ्यांना डच्चू तर दुसरीकडे मेस्सीला केलं ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर; Byju’s ची ग्लोबल मार्केटमध्ये उडी

सध्या जागतिक पातळीवर काही खासगी कंपन्या कामगार कपातीमुळे जोरदार चर्चेत आहेत. बायजू ही एडटेक कंपनी त्यापैकीच एक कंपनी होय. या कंपनीने नुकतंच पाच हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. त्यामुळे बायजू चर्चेत आहे. त्यातच आता या कंपनीने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. बायजूने प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची कंपनीचा पहिला जागतिक ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. या संदर्भात कंपनीने एक निवेदनदेखील जारी केलं आहे. बायजू कंपनीला 2020-21मध्ये कोट्यावधी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यात आता कंपनीने हा निर्णय जाहीर केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. टीव्ही नाइन हिंदीने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

सुनील शेट्टी-विवेक ओबेरॉय आमने-सामने; ‘ही ‘ मराठमोळी अभिनेत्री मुख्य भूमिकेत

अभिनेता सुनील शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांचा दमदार अभिनय असलेल्या ‘धारावी बॅक’ या सिरीजचा टीझर अखेर रिलीज झाला आहे. मागचे अनेक दिवस या सिनेमाची चर्चा होती. ‘आश्रम’, ‘भौकाल’ आणि ‘रक्तांचल’ सारख्या वेब सीरिजनंतर एम एक्स प्लेअरवर ‘धारावी बॕक’ ही नवी सीरिज पाहायला मिळणार आहे. विवेक ओबेरॉय, सुनिल शेट्टी आणि सोनाली कुलकर्णी यात प्रमुख भूमिकेत आहेत. सीरिजचा टीझर पाहून ही सिरीज हिट होईल असं म्हटलं जात आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरातील गोष्ट सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.

EPFO कडून PF खात्यावर व्याज ट्रान्सफर सुरू; घरबसल्या चेक करा अकाउंट बॅलन्स

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. EPFO ने आर्थिक वर्ष 2021-22 साठी व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आता लवकरच ईपीएफओच्या 7 कोटी ग्राहकांच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा होतील. ईपीएफओने नुकतेच ट्विट करून ही माहिती दिली आहे. सरकारने पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याजदर निश्चित केला आहे. पीएफ खातेधारकांना त्यांच्या ठेवींवर 8.1 टक्के दराने व्याज मिळेल. जो गेल्या 40 वर्षातील सर्वात कमी व्याजदर आहे.ईपीएफओच्या वेबसाइटवर जा. Our Services च्या ड्रॉपडाउनमधून For Employees निवडा. यानंतर सदस्य पासबुकवर क्लिक करा. आता UAN नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. पीएफ खाते निवडा आणि ते उघडताच तुम्हाला शिल्लक दिसेल. एसएमएसद्वारे शिल्लक तपासण्यासाठी, ‘EPFOHO UAN ENG’ टाइप करून 7738299899 वर संदेश पाठवा. तुम्हाला प्रत्युत्तरात शिल्लक माहिती मिळेल. याशिवाय उमंग अॕपवरूनही पीएफ शिल्लक तपासता येईल.

औरंगाबाद : आदित्य ठाकरेंची सभा रद्द, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन साधणार संवाद

माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली असून आता आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. तसेच शेतकऱ्यांशी बांधावर ते संवाद साधणार आहेत.
सिल्लोड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावर आदित्य ठाकरे ठाकरे जाणार आहेत. सभेऐवजी आता शेतकरी बांधावर संवादाला आदित्य ठाकरेंनी प्राधान्य दिले आहे. यासंबंधीच्या सूचनाही सेना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी याबाबतची माहिती दिली.

अशोक चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात? ‘भाभीजीं’नंतर श्रीजयाचीही चर्चा

राजकारणातील अनेक नेत्यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे. त्यात आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची तिसरी पिढी राजकारणात पाऊल टाकत असल्याचं दिसून येत आहे. अशोक चव्हाण यांना दोन जुळ्या मुली आहेत. यापैकी श्रीजया चव्हाण राजकारणात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. नांदेडमध्ये लागलेल्या बॅनरवरुन याची चर्चा रंगली आहे.

सुषमा अंधारे हे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट, उद्धव ठाकरेंनी सावध राहावे, गुलाबराव पाटलांचा इशारा

ठाकरे आणि शिंदे गटातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. एका गटाच्या आरोपानंतर दुसऱ्या गटातून त्याला प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे. शिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी 1 तारखेला धरणगाव येथे प्रबोधन सभा घेऊन शिंदे गटावर चौफेर टीका केली. यातही गुलाबराव पाटील यांच्यावर अंधारे यांनी सडकून टीका केली. मी तुम्हाला सळो की पळो करून सोडणार, आज तुम्हाला झोप येणार नाही, असा इशाराच त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना दिला. यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन सभा ही जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणारी आहे. सुषमा अंधारे या राष्ट्रवादीचे प्रॉडक्ट आहे, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. उरली सोडलेली शिवसेना डॅमेज करण्यासाठी राष्ट्रवादीकडून सुषमा अंधारे हे पार्सल इकडे आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या या पार्सल पासून सावध रहावे. राष्ट्रवादीचे हे पार्सल तुमच्या पक्षाला डब्यात नेल्याशिवाय राहणार नाही, अशी जोरदार टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

औरंगाबाद : 6 महिन्यांमध्ये 1900 महिला ॲनिमियामुक्त

औरंगाबाद शहरातील 7 वस्त्यांमधील 3 हजार महिलांचे सर्वेक्षण सावित्रीबाई फुले एकात्म विकास मंडळाच्या माध्यमातून केले. यामध्ये 7 वस्त्यांमधील 3 हजार महिला पैकी 1900 महिलांना ॲनिमिया हा आजार आढळून आला होता. यामध्ये ॲनिमिया आढळलेल्या 1900 महिलांना ‘रमा’ प्रकल्पाने सहाच महिन्यांत खाण्याच्या सवयी, आहारात बदल, औषधोपचार करून ॲनिमियामुक्त केले.
महिलांकडून स्वतःच्या आरोग्यापेक्षा घरातील मंडळींच्या आरोग्याची अधिक काळजी घेतली जाते. यामुळे महिलांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतं. यामध्ये आहारात कमतरता खाणेपिण्यामध्ये चुकीच्या सवयी या सोबतच अवेळी जेवणामुळे महिलांमध्ये वेगवेगळ्या आजार उद्भवत असतात. ही गोष्ट लक्षात घेऊन औरंगाबाद शहरातील सावित्रीबाई फुले एकात्म विकास मंडळातर्फे विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी शहरातील 7 वस्त्यांमध्ये ॲनिमिया आजारा संदर्भात सर्वेक्षण केलं. यामध्ये 3 हजार महिलांपैकी 1900 महिला ॲनिमिया ग्रस्त आढळून आल्या होत्या.

भररस्त्यात शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या; मंदिराबाहेर आंदोलनादरम्यानच…

पंजाबमधील अमृतसरमध्ये शिवसेना नेता सुधीर सुरींवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात नेत्याचा मृत्यू झाला आहे. सुरी एका मंदिरासमोर आंदोलनासाठी बसले होते. यादरम्यान त्यांना गोळी घालण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळ मंदिराबाहेर कचऱ्यात देवांच्या मूर्ती सापडल्यामुळे ते आंदोलन करीत होते. यादरम्यान गर्दीतून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात शिवसेना नेत्याचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्याच्या एक दिवस आधी अमृतसरमधील शिवसेना नेता सुधीर सुरी यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. ते आपल्या सुरक्षा रक्षकांसोबत गोपाळ मंदिराबाहेर होते. मंदिराच्याबाहेर काही लोकांनी देवी-देवतांच्या खंडित मूर्ती फेकल्या होत्या. सुरींना याबाबत कळालं तर ते मंदिराबाहेर पोहोचले. यावेळी त्यांनी मूर्तींची अशी अवस्था करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी मंदिराबाहेर धरणे आंदोलन सुरू केलं. यावेळी धरणे आंदोलनात एक पगडीधारक तरुण बसला होता. त्याने संधी मिळताच सुरींवर गोळ्या झाडल्या.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.