आज इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताचे विजयाचे लक्ष्य

 गेल्या सामन्यातील निराशाजनक पराभवानंतर इंग्लंडविरुद्ध रविवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात दमदार पुनरागमनाचा भारतीय संघाचा निर्धार आहे. या सामन्यात विजयासह मालिका जिंकायची असल्यास भारतीय फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे.

एकदिवसीय मालिकेपूर्वी झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आक्रमक शैलीत फलंदाजी करण्यावर भर दिला होता. त्यानंतर आमचा संघ एकदिवसीय मालिकेतही सकारात्मक मानसिकतेनेच खेळेल, असा विश्वास रोहितने व्यक्त केला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात २४७ धावांचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी ढेपाळली. रोहित आणि शिखर धवन यांना आक्रमक सुरुवात करून देण्यात अपयश आले. रीस टॉपली आणि डेव्हिड विली यांच्या स्विंग व वेगवान गोलंदाजीविरुद्ध दोन्ही सलामीवीर चाचपडताना दिसले. तसेच विराट कोहली आणि ऋषभ पंतही लवकर बाद झाले. त्यामुळे भारताला फलंदाजीच्या शैलीबाबत पुनर्विचार करावा लागणार आहे.

इंग्लंडच्या फलंदाजांनाही या मालिकेत छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात ज्या संघाचे फलंदाज अधिक दर्जेदार कामगिरी करतील, त्यांना विजयाची अधिक संधी असेल.

रोहितवर भिस्त; कोहलीची चिंता

भारतीय फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने कर्णधार रोहितवर असेल. एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात रोहितने अर्धशतक साकारले होते. मात्र, भारताला विराट कोहलीची चिंता आहे. दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकलेल्या कोहलीला दुसऱ्या सामन्यात केवळ १६ धावा करता आल्या. मधल्या फळीत ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंडय़ा यांच्या कामगिरीत सातत्य गरजेचे आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजाला गोलंदाजीत छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे लेग-स्पिनर यजुर्वेद्र चहलसह जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असेल.

टॉपली, विलीवर नजर : दुसऱ्या सामन्यातील इंग्लंडच्या विजयात डावखुरा वेगवान गोलंदाज रीस टॉपलीने (६/२४) प्रमुख भूमिका बजावली. तसेच डावखुऱ्या डेव्हिड विलीने (४१ धावा आणि एक बळी) अष्टपैलू योगदान दिले. त्यामुळे हे दोघे कामगिरी सातत्य राखतात का, याकडे सर्वाची नजर असेल. मात्र, भारताप्रमाणेच इंग्लंडच्या फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा आवश्यक आहे. त्यांच्याकडे कर्णधार जोस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो यांसारखे मोठे फटके मारण्यात सक्षम असलेले फलंदाज आहेत. मात्र, त्यांना दोन सामन्यांत अपयश आले आहे.

संघ :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, जसप्रित बुमरा, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, इशान किशन, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, यजुर्वेद्र चहल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, रीस टॉपले, क्रेग ओव्हरटन, सॅम करन.

  • वेळ : दुपारी ३.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३ (संबंधित एचडी वाहिन्या)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.