आज दि.१ जानेवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

नाशिकनंतर सोलापूरमध्ये भीषण घटना; फटाक्याच्या फॅक्टरीत स्फोट, तिघांचा मृत्यू

नाशिकमधील जिंदाल कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र भडकलेली आग तसेच दाखल झालेल्या रुग्णवाहिका लक्षात घेता या घटनेत अनेकजण जमखी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोलापूर जिल्ह्यात भयानक घटना घडली आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला.फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना ही घटना घडली. या फॅक्टरीमध्ये 40 हून अधिक कर्मचारी काम करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे.या दोन स्फोटामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

सार्वजनिकरित्या उत्पन्न सांगू नका, अन्यथा…, शरद पवारांचा शेतकऱ्यांना धोक्याचा इशारा!

नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शरद पवारांनी द्राक्ष बागायतदार आणि उस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली, यावेळी शरद पवारांनी तुमचं उत्पन्न सार्वजनिकरित्या सांगू नका, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला. इंदापूर तालुक्यातील कळस मधुकर खर्चे यांच्या शेताला शरद पवारांनी भेट दिली.

मधुकर खर्चे यांनी एका एकरात 100 टनापेक्षा अधिक उत्पन्न घेतलं आहे. गेली अनेक वर्ष खर्चे 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत. उसाच्या शेताला भेट दिल्यानंतर शरद पवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालं आहे. औरंगाबादच्या खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घएतला. या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केशवराव धोंडगे हे दीर्घकाळ विधीमंडळाचे सदस्य राहिले. त्यांनी आमदार आणि खासदार म्हणून लोकांचं प्रतिनिधित्व केलं. विधानसभेतली त्यांची भाषणं खूप गाजली. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेते अशी त्यांची ख्याती होती.

PCB आर्थिक संकटात, वेतन कपातीचा निर्णय; शक्य नसेल तर घरी जा, बोर्डाने बजावले

पाकिस्तान क्रिकेट बोर्डात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. पीसीबीच्या अध्यक्षपदावरून रमीज राजा यांना हटवण्यात आले. त्यानंतर आता नवा आदेश देण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे बोर्डाने संचालकांना स्पष्ट शब्दात बजावले असून सर्वांच्या वेतनात 30 ते 40 कोटी रुपये कपातीसाठी तयार रहावं अन्यथा घरी जावं असं सांगितलं आहे. नजम सेठी हे पीसीबीचे नवे अध्यक्ष बनले आहेत. जुन्या निवड समितीला हटवण्यात आलं आहे. माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला समितीचा हंगामी अध्यक्ष केलं आहे.

“चीनकडून बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न,…”, दलाई लामा यांचं विधान

दोन दिवसांपूर्वी बिहार पोलिसांनी चिनी गुप्तहेर महिलेला अटक केली होती. ही महिला तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांची हेरगिरी करत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिलेला अटक केली. अशात दलाई लामा यांनी चीनवर मोठा आरोप केला आहे. चीन बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, ते यशस्वी होणार नाही, असं दलाई लामा यांनी म्हटलं.बिहारमधील बोधगया येथे दलाई लामा बोलत होते. “चीन बौद्ध धर्माला विषारी समजत आहे. धर्म नष्ट करण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. बौद्ध धर्माचं विहार तोडण्यात आलं. तरीही बौद्ध धर्म आपल्या जागी उभा आहे. बौद्ध धर्माला नुकसान पोहचवलं, तरी सुद्धा चीनमधील लोकांची आस्था कमी झाली नाही,” असं दलाई लामा यांनी सांगितलं.

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चांवर समीर चौघुलेंनी सोडंल मौन,

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात हा कार्यक्रम अगदी यशस्वी ठरला. आता या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांची एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका प्रसारित होणार म्हटल्यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बंद होणार असल्याच्या विविध चर्चा रंगत होत्या. आता या चर्चांवर समीर चौघुले यांनी उत्तर दिलं आहे.“पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बंद होणार नाही. सोमवार, मंगळवार, बुधवार हा कार्यक्रम असणार आहे. तसेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार ”’पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही मालिका असणार आहे. शिवाय या मालिकेची कथाही खूपच भन्नाट आहे.” म्हणजेच आता आठवड्यातील फक्त तीन दिवस प्रेक्षकांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाहता येणार आहे.

महाराष्ट्राला ‘वेड’ लावण्यात रितेश-जिनिलीया यशस्वी, दोन दिवसांत चित्रपटाने कमावला ‘चार ‘ कोटींचा गल्ला

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी सध्या प्रेक्षकांना वेड लावलं आहे. गेले अनेक दिवस त्यांचा ‘वेड’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. अखेर ३० डिसेंबरला तो सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलेलं आहे. दोन दिवसात या चित्रपटाने मोठाच गल्ला जमवलेला आहे.अनेक दिवस रितेश आणि जिनिलीया त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होते. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं. तर त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हिने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आहे. अशा परिस्थितीतही रितेश आणि जिनिलीया प्रेक्षगकांचं मन जिंकण्यात कुठेही कमी पडलेले नाहीत. त्यांच्या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. चित्रपटाने दोन दिवसात किती रक्कम कमावले याचा आकडा आता समोर आला आहे.

इंग्रजांनी संपवले सहा वर्षांतील भारताचे वर्चस्व; विराटच्या राज्यात कमावलेलं रोहितच्या संघानं गमावलं

नवीन वर्षाच्या आगमनासोबत भारतीय संघासमोर एक नवीन क्रिकेट कॅलेंडर आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळण्याव्यतिरिक्त भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, आशिया कप, वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा खेळायच्या आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा आहे.२०१४ मध्ये विराट कोहलीला कसोटी संघाची कमान मिळाली होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने खेळाच्या मोठ्या फॉरमॅटमध्ये नवीन उंची गाठली. २०१६ मध्ये भारताचा संघ कसोटीत नंबर-१ बनला होता. तेव्हापासून, टीम इंडिया पहिल्या स्थानावर राहत या फॉरमॅटमध्ये सतत वर्ष संपवत होती. २०२२ ला सुरुवात झाली तेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. कर्णधारपद सोडण्यापूर्वी विराटच्या नेतृत्वाखाली संघाने कसोटी मालिका १-२ अशी गमावली होती. यानंतर रोहित युग सुरू झाले.कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर राहत टीम इंडियाने २०२२ या वर्षाला निरोप दिला. आतापर्यंत सलग सहा वर्षे कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहत सरत्या वर्षांना निरोप दिली होता. परंतु २०२२ वर्षाचा निरोप घेताना पहिल्यादाच टीम इंडियाला अव्वल स्थान राखता आले नाही. इंग्लंड संघाने यावर्षी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर राहून वर्षाचा शेवट केला आहे. ज्यामुळे भारत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.