शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे खलबतं, उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर
भाजपकडून नुकतंच उपराष्ट्रपतीच्या पदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला. भाजपकडून पश्चिम बंगालचे सध्याचे राज्यपाल जगदीप धनकर यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर आज विरोधी पक्षाकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत घोषणा केली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी UPA कडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. उपराष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ बंगल्यावर विरोधी पक्षांची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी इतर नेत्यांसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत यूपीएचे उमेदवार जाहीर केला.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हैदोस, पोलीस-सीआरपीएफ जवानांवर हल्ला, अधिकाऱ्याचा मृत्यू
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हैदोस काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज एका नाक्यावर पोलीस आणि सीआरपीएफ जवान गाड्यांची चेकींग करत होते. या दरम्यान अचानक दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवान आणि पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारात एक सीआरपीएफ अधिकारी शहीद झाले आहेत. अतिशय दुर्देवी अशी ही घटना आहे. सीआरपीएफ अधिकारी धारातीर्थ पडल्यानंतरही गोळीबार सुरु होता. या दरम्यान पोलीस आणि सैन्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. दोन्ही बाजून अद्याप चकमक सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारतात येणारे विमान अचानक पाकिस्तानात लँड
शारजाह येथून हैदराबादला येणारे एअर इंडिगोचे विमान अचानक पाकिस्तानकडे वळवण्यात आले. विमानात अचानक अशा काही घटना घडल्या कि ते विमान पाकिस्तानमध्ये सावधगिरीने लँडिंग करण्यात आले. दरम्यान पाकिस्तानच्या कराचीत हे विमान सुरक्षित उतरवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे इंडिगो एअरवेजकडून सांगण्यात आले.विमानाने उड्डान केल्यावर वैमानिकाला तांत्रिक दोष आढळून आला. वैमानिकाने आवश्यक त्या शक्यता तपासल्या तरीही विमानात कोणतीही सुधारणा होत नसल्याने खबरदारी म्हणून विमान कराचीला वळवण्यात आले.
सीबीआयची मोठी कारवाई, लाचखोर अधिकाऱ्याला अटक करत कोट्यवधीची रक्कम जप्त
सीबीआयने एका लाचखोर कृषी अधिकाऱ्याला अटक केली आहे. कृषी मालाच्या निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी लाच स्वीकारत असल्याच्या आरोपावरुन त्याला अटक करण्यात आली आहे. सीबीआयने केलेल्या कारवाईत 1 कोटी 86 लाख रुपयांची रक्कमही जप्त केली आहे.झाडांची रोपे, तसेच अन्य कृषी माल बोटीद्वारे परदेशात पाठविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे एक प्रमाणपत्र देण्यात येते. कृषी मालाच्या गुणवत्तेशी संबंधित असे हे प्रमाणपत्र असते. कृषी मंत्रालयाच्या विशाखापट्टणम येथील विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या आर. पद्म सिंग या अधिकाऱ्याकडे हे प्रमाणपत्र जारी करण्याचा कार्यभार होता.
पुण्यातील भीषण आगीत लग्नासाठी आणलेले साहित्य नष्ट, 15 घरं जळून खाक
पुण्यातील रक्षकनगरमध्ये आग लागून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना काल मध्यरात्री घडली. या भीषण आगीत तब्बल 15 घरे जळून खाक झाली आहेत. इतकेच नव्हे तर लग्नासाठी आणलेले साहित्यही जळून खाक झाले आहे. तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संसारपयोगी वस्तू जळाल्या आहेत.आगीनंतर दरवेळी रहिवाशांना प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन मिळते. मात्र, योग्य प्रमाणात मदत मिळत नाही. काल मध्यरात्री लागलेल्या आगीत नागरिकांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे या नागरिकांनी मदतीचे आवाहन केले आहे. ही आग बघायला बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
‘एकनाथ शिंदेना पाठिंबा देण्यापेक्षा माझ्याशी बोला’ ठाकरेंचा फडणवीसांना फोन
महाराष्ट्रात मागच्या महिन्यात राजकीय भूकंप घडल्यानंतर आता पडद्यामागे घडलेल्या घडामोडी समोर येऊ लागल्या आहेत. शिवसेनेमध्ये पडलेली फूट आता निस्तरता येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून चर्चा केल्याचं वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना फोन केला आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याऐवजी तुम्ही माझ्यासोबत चर्चा करा, अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली, पण फडणवीस यांनी ही ऑफर धुडकावून लावली, असं या वृत्तात सांगण्यात आलं आहे.
फडणवीसांसोबत बोलणी फिस्कटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण या दोघांसोबत त्यांचा संवाद होऊ शकला नाही. भाजपच्या शिर्ष नेतृत्वाने 2019 साली उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारच्या संवादाला तेव्हा नकार दिला होता.
पुण्यात 50 मेंढ्यांचा मृत्यू, लाखोंचे नुकसान तर 30-40 मेंढ्या अत्यवस्थ
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लोणीदेवकर (एमआयडीसी) परिसरात चरावयास आणलेल्या कळपातील जवळपास 50 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अजून जवळपास ३० ते ४० मेंढ्या अत्यवस्थ आहेत. या मेंढ्या दौंड तालुक्यातील गिरीम येथील मेंढपाळ भिवा रामा झिटे यांनी चरायला आणल्या होत्या.
देशभरातील 17 पक्षांच्या बैठकीत शिवसेनेची रोखठोक भूमिका
शिवसेनेच्या अनेक लोकप्रतिनिधींवर ईडी आणि सीबीआयकडून कारवाई करण्यात आली. अनेकांच्या घरावर छापे टाकण्यात आले. शिवसेनेचे अर्जुन खोतकर, संजय राऊत, प्रताप सरनाईक, अनिल परब, भावना गवळी, आनंदराव अडसूळ अशा अनेक नेते आणि त्यांच्या कुटुंबियांवर ईडीने कारवाई केली. ईडी आणि सीबीआयच्या या कारवाईवर शिवसेनेकडून अनेकदा संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेत्यांनी केंद्रीय यंत्रणांबाबतची आपली खदखद सर्व विरोधी पक्षांच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांपुढे दिल्लीत मांडली.
राज्यात साथरोग वाढीचा धोका…आरोग्य विभाग सज्ज!
राज्याचा ग्रामीण भागात साथरोग आजाराने उचल खाल्ली असून हिवताप, डेंग्यू तसेच इन्फ्लुएंझा एच १ एन १ चा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत. अनेक दुर्गम व आदिवासी भागातील गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटून आरोग्य व्यवस्था पोहोचू शकत नाही हे लक्षात घेऊन यंदा आधीच आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.गेल्या काही दिवसात मुसळधार पावसाने संपूर्ण राज्याला झोडपून काढले असून पावसाळी व साथरोग आजारांचा विचार करून आरोग्य विभागाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, चिकनगुन्या तसेच स्वाईन फ्लू एच १ एन १ चे रुग्ण वाढू लागले आहेत. यंदा मे ते १४ जुलैपर्यंत हिवतापाच्या ४८७८ रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. २०२१ मध्ये राज्यात १२,०८५ लोकांना हिवतापाची लागण झाली होती तर १४ जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
“गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय हवं”, संभाजीराजे छत्रपतींची राज्य सरकारकडे मागणी
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय हवं, अशी मागणी राज्यसरकारकडे केली आहे. राज्यातील अनेक गडकिल्ल्यांची अवस्था अत्यंत जीर्ण स्वरुपाची झाली असून पावसाळ्यात तटबंदी ढासळण्याचे प्रकार घडतात. त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपाची डागडुजी केली जाते. पण असे प्रकार घडणे नेहमीचेच झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय किंवा महामंडळ असावं, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
शिवसेना बंडखोरीबाबतच्या सर्व याचिकांवर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 20 जुलै ला होणार सुनावणी
शिवसेनेतील बंडखोरीचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. याबाबत मोठा निर्णय झाला आहे. शिवसेनेतील बंडखोरीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सर्व याचिकांवर २० जुलैला सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे ही सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यावर काय निरिक्षणं नोंदवतं आणि काय निकाल देतं याकडे राज्यातील सर्वांचंच लक्ष असणार आहे.
आशिया चषकाच्या आयोजनाचे भवितव्य अधांतरी!
भारताचा वेस्ट इंडीज दौरा झाल्यानंतर आशिया चषकाचे आयोजन केले जाणार आहे. ही स्पर्धा श्रीलंकेमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, श्रीलंकेतील सध्याची राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्थिती बघता तिथे स्पर्धेचे आयोजन होणे शक्य नसल्याचे संकेत लंकन क्रिकेट मंडळाच्या सचिवांनी दिले आहेत. श्रीलंकेऐवजी संयुक्त अरब अमरातीमध्ये (युएई) आशिया चषकाचे आयोजन होऊ शकते.
आनंद महिंद्रांनी सिंधूचं केलं या शब्दांत कौतुक
सिंगापूर ओपन स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने चीनच्या वांग झि यी चा पराभव करत विजय मिळवला आहे. या कामगिरीनंतर सिंधू सुपर ५०० विजेतेपद तिने पटकावले आहे. सिंधूने पहिल्यांदाच सिंगापूर ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावल आहे. सिंधूच्या या कामगिरीचे सगळीकडून कौतुक होत आहे. उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही सिंधूचा खास फोटो ट्वीट करत तिचे कौतुक केले आहे.
ICSE बोर्डाचा 10 वीचा निकाल जाहीर
CISCE ने ICSE 10 वीचा निकाल जाहीर केला आहे. ICSE 10वीच्या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये बसलेले विद्यार्थी CISCE वेबसाइट cisce.org वर जाऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. याशिवाय results.cisce.org, results.nic.in आणि https://www.digilocker.gov.in/ या वेबसाइटवरही निकाल पाहता येतील. ICSE 10 व्या सेमिस्टरची परीक्षा 25 एप्रिल ते 20 मे 2022 या कालावधीत घेण्यात आली. तर पहिल्या सत्राची परीक्षा 15 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत घेण्यात आली होती. त्याचा निकाल 7 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध झाला होता.
SD Social Media
9850 60 3590