दिल्ली विमानतळावर लालू प्रसाद यादव यांची प्रकृती पुन्हा बिघडली

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यामुळे त्यांना एम्समध्ये भरती करण्यात आलं आहे. त्यांच्या किडनी आणि इतर चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचा रिपोर्ट येणं अजून बाकी आहे. लालूप्रसाद यादव रांची जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर आले होते. मात्र, विमानतळावरच त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना पुन्हा एम्समध्ये दाखल करण्यात आले.

त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पाच डॉक्टरांची टीम तैनात आहे. या आधी लालूप्रसाद यादव बुधवारी एम्समध्ये आले होते. मात्र, त्यांना अॕडमिट करून घेण्यास नकार देण्यात आला होता. त्यांना रांचीच्या रिम्स (RIMS) रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे लालूप्रसाद यादव रांचीला जाण्यासाठी ते निघाले होते. मात्र, तब्येत बिघडल्याने नंतर एम्सच्या परवानगीनेच त्यांना रुग्णालयात भरती करून घेण्यात आलं आहे.

लालूप्रसाद यादव यांच्यावर रांचीच्या रिम्समध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यांची तब्येत बिघडल्याने एअर अॕब्युलन्सद्वारे त्यांनी दिल्लीत एम्समध्ये आणण्यात आलं. तिथे त्यांना एमर्जन्सी वॉर्डात रात्रभर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तसेच रिम्समध्ये त्यांच्यावर उपचार करण्याचा सल्लाही देण्यात आला होता. त्यानंतर लालूप्रसाद यादव रांचीला जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर आले होते. मात्र, विमानतळावरच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा एम्समध्ये भरती करण्यात आलं.

लालू यादव यांच्यावर बहुचर्चित डोरंडा कोषागारमधून 139.35 कोटी रुपये हडपल्याचा आरोप असून या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच 60 लाखांपर्यंतचा दंडही ठोठावला आहे. त्यामुळे त्यांची होटवार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. मात्र, तब्येत बिघडल्याने त्यांना रिम्सच्या पेईंग वॉर्डात भरती करण्यात आले. लालूप्रसाद यादव यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदय रोग, किडनी रोग, किडनी स्टोन, टेन्शन, थैलेसीमिया, प्रोस्टेट वाढणे, यूरिक अॕसिड वाढणं, मेंदू संबंधित विकार, कमकुवत इम्युनिटी, उजव्या खांद्याच्या हाडाचा प्रॉब्लेम, पायाच्या हाडाचा प्रॉब्लेम आदी आजार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.