आरबीआयचा मोठा निर्णय; २ हजारांच्या नोटा चलनातून काढल्या, ‘या’ तारखेपर्यंत नोटा बदलून घेता येणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं शुक्रवारी मोठा निर्णय घेत २ हजारांच्या नोटा चलनातून बाहेर काढल्या आहेत. २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत आपल्याकडच्या २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करता येणार आहे. २० हजार रुपये म्हणजेच एका वेळी १० नोटा जमा करता येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी २ हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. परंतु २ हजार रुपयांच्या बँक नोटा कायदेशीर निविदा (legal tender) म्हणून सुरू राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने “इतर मूल्यांच्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत,” असे कारण देत २ हजारांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर केलाय.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं २००० च्या नोटा चलनातून काढून घेतल्या असल्या तरी त्या नोटा सध्या अवैध ठरणार नाहीत. गेल्या काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन ५०० आणि २००० च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजाराची नोट बाजारात आली होती. त्यानंतर आरबीआयने २०१९ पासून २ हजारांच्या नोटांची छपाई बंद केली आहे.
समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा, तूर्तास अटक टळली
आर्यन खान ड्रग्स प्रकरणातल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून समीर वानखेडे यांना हायकोर्टाने तूर्तास दिलासा दिला आहे. समीर वानखेडेंनी तपासामध्ये सहकार्य करावं, तूर्तास त्यांना अटक करणार नाही, अशी ग्वाही सीबीआयने हायकोर्टात दिली. वानखेडेंनी सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांकडे जाऊन आपला जबाब नोंदवावा, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. हायकोर्टाच्या आदेशामुळे समीर वानखेडे यांना 22 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालं आहे. उद्या सीबीआय वानखेडेंचा जबाब नोंदवणार आहे, त्यानंतर 22 मे रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.
जिल्हा विभाजनानंतर आता स्वतंत्र खानदेशाची मागणी
खानदेशातील प्रकल्प सातत्याने इतरत्र हलवले जात असतील, सरकारकडून सातत्याने खानदेशावर अन्याय होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातून खानदेशला वेगळं करण्याची आवश्यकता आहे, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे. प्रकल्प होत नाही, विकास रखडला आहे. सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे इच्छा नसतानाही खानदेश महाराष्ट्रपासून वेगळा करावा असं म्हणावं लागत आहे, असा यू टर्न सुद्धा खडसे यांनी यावेळी घेतला.एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघातील वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र पाठोपाठ आता, पशु वैद्यकीय महाविद्यालय शासनाने दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलं आहे. मात्र, जिल्ह्यातले मंत्री निमूटपणे त्याकडे पाहत आहे, मी एकटाच बोलतो पण सरकारकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचे खडसे यांनी सांगितले.
झाडावर भरली सापांची ‘शाळा’, मोजता येणार नाही इतके किंग कोब्रा
साप जरी नाव ऐकलं तर भलेभले पळ काढतात. पण जर एकाचवेळी अनेक साप तेही किंग कोब्रा असतील तर मग काय होईल याचा विचार केला नाही तो बरा. पण उत्तर प्रदेशमधील बस्सी या भागात एकाच झाडावर अचानक 12 पेक्षा जास्त विषारी नाग आढळून आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.उत्तर प्रदेशमधील बस्ती जनपद येथील गौर पोलीस स्टेशन हद्दीतील अजगेवा जंगलात हा व्हिडीओ समोर आला आहे. एका झाडावर एक नाही दोन नाहीतर जवळपास डझनभर किंग कोब्रा आढळून आले. विशेष म्हणजे, हे झाड चंदनाचं नव्हतं, तर एक जंगली झाड होतं. या झाडावर सापांनी एकच ठिय्या मांडला होता.
74 वर्षांचे माजी प्राध्यापक सायकलवर फिरताय अख्खा भारत
आयुष्यातील उतार वयात वृद्ध लोक बराचसा वेळ हा आपल्या नातवंडात घरीच घालवणे पसंत करतात. पण काही अवलीयांनी आपले संपूर्ण आयुष्यात समाजासाठी देऊ केलेले असते. असाच एक अवलिया सध्या सायकलवरून भारत भ्रमंती करतोय.दिल्ली आयआयटीतील माजी प्राध्यापक असलेले 74 वर्षीय पद्मश्री डॉ. किरण सेठ हे सध्या त्यांच्या सायकलवरून अख्खा भारत फिरत आहेत.ऑगस्ट महिन्यात सुरू झालेला त्यांचा श्रीनगर ते कन्याकुमारी हा प्रवास त्यांनी फेब्रुवारी महिन्यात पूर्ण केला आहे. तर सध्या ते परतीच्या सायकल प्रवास करत असून कोल्हापुरात आले होते.2009 मध्ये डॉ. सेठ यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. तर ‘स्पिक मैके’ या संस्थेचे ते संस्थापक आहेत.
सांगलीत साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे गटातच लढत
गेल्या तीन वर्षापासून बंद असलेला आणि जिल्हा बँकेने थकित कर्जासाठी ताब्यात घेतलेल्या आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणुक भाजप विरूध्द शिवसेना शिंदे गट यांच्यात अत्यंत चुरशीने होण्याची चिन्हे आहेत. या कारखान्याच्या निमित्ताने राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यातच राजकीय संघर्ष पाहण्यास मिळण्याची चिन्हे आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आ. अनिल बाबर यांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील आणि कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तथा भाजपचे माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यात ही राजकीय लढाई असेल.
“शाकाहारी टूथपेस्ट सांगून माशांच्या हाडांचा…”, जितेंद्र आव्हाडांचा पतंजली आणि रामदेव बाबांवर गंभीर आरोप
आयुर्वेद आणि नैसर्गिक औषधांपासून उत्पादने बनवण्याचा दावा करणाऱ्या पतंजली या कंपनीविरोधात गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत कंपनीला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे. कंपनीची टूथपेस्ट दिव्या दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. विशेष म्हणजे कंपनी त्यावर हिरवे लेबल लावते, म्हणजे हे उत्पादन पूर्णपणे शाकाहारी असल्याचं सांगत ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचंही तक्रारदाराचं म्हणणं आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही पतंजली आणि रामदेव बाबा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.कोलगेट “आमच्या टूथ पेस्टमध्ये नमक आहे”, असं स्पष्ट सांगून आपले उत्पादन विकते. बाबा रामदेव यांची पतंजली मात्र, “आमची टूथपेस्ट शाकाहारी आहे” असे सांगून, लोकांना “फिश बोन” (माशांची हाडे) युक्त मासांहारी टूथपेस्ट विकत आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
तुळजा भवानी मंदिर प्रशासनाचा ‘ड्रेस कोड’वरुन अवघ्या काही तासांत यू टर्न! ‘ते’ निर्बंध मागे
महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली एक देवी म्हणजे तुळजा भवानी. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंदिर संस्थानाच्या वतीने एक नियमावली जाहीर केली गेली होती. अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडा परिधान करणाऱ्या नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे फलक मंदिर परिसरात लावले आहेत. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचं भान ठेवा. मात्र यावरुन वाद सुरु झाला. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये स्पष्टीकरण देत असा कुठलाही ड्रेसकोड मंदिरात येण्यासाठी नसल्याचं मंदिर समितीने म्हटलं आहे.
तापमान १.५ अंश सेल्सियसने वाढणार, म्हणजे काय? भारतावर त्याचे परिणाम आताच दिसू लागलेत?
जागतिक तापमानवाढीवर तत्परतेने नियंत्रण आणता आले नाही तर विनाशकारी परिणाम भोगावे लागतील, असा धोक्याचा इशारा अनेकदा देण्यात आला. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने नव्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) नुकताच एका धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला असून येत्या पाच वर्षांत जगाचे सरासरी तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढणार आहे. त्याशिवाय भारतासह भारतीय उपखंडातील अनेक देशांना यंदाच्या उन्हाळ्यात उकाड्याचा भयंकर त्रास सहन करावा लागत असून हा हवामान बदलाचाच परिणाम असल्याचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला दिग्गजांची मांदियाळी
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या विराजमान होणार आहेत तर डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होणार आहेत यावर आत्ता शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा पेच सोडवणं काँग्रेससाठी सोपं नव्हतं. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु होती. माझ्यासोबत १३६ आमदार आहेत असं डीके शिवकुमार यांनी ठणकावून सांगितलं होतं. तसंच राहुल गांधींना भेटल्यानंतरही ते उपमुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते असंही सांगतिलं जातं आहे. अशात सोनिया गांधींनी शिष्टाई केली आणि डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा पेच संपुष्टात आला. आता उद्या २० मे रोजी शपथविधी होणार आहे. या शपथविधीला देशभरातील अनेक नेत्यांना आमंत्रणं पाठवण्यात आली आहेत.
आयुष्यमान खुरानावर कोसळला दुःखाचा डोंगर; अभिनेत्याच्या वडीलांचं दुःखद निधन
बॉलीवूड मधून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान आणि अपारशक्ती खुरानाच्या वडिलांचं निधन झालं आहे. आयुष्मानच्या वडिलांचे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. अभिनेत्याच्या प्रवक्त्याने या दु:खद बातमीला दुजोरा देणारे अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. आयुष्मानच्या वडिलांच नाव पी खुराणा असं असून तर प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ होते. या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या निधनाने खुराना कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही बातमी ऐकून आयुष्यमान आणि अपारशक्तीचे चाहते शोक व्यक्त करत आहेत.वृत्तानुसार, आयुष्मान खुरानाचे वडील पंडित पी खुराना यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आयुष्मान आणि अपारशक्ती हे दोन्ही भाऊ त्यांच्या वडिलांच्या खूपच जवळ होते. या अभिनेत्याचे वडील पंडित पी खुराना हे ज्योतिषशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांच्या निपुणतेसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी या विषयावर अनेक पुस्तकेही लिहिली होती. त्यांनी या क्षेत्रात प्रचंड आदर आणि सन्मान मिळवला होता.
SD Social Media
9850 60 3590