मराठी, हिंदीसह साऊथ चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे मराठमोळे अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे. ते या ना त्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. यावेळी त्यांचं चर्चेत येण्याचं कारण मात्र गंभीर आहे. अभिनेते सयाजी शिंदेवर चित्रपट निर्मात्याने फसवणुकीचे आरोप केले आहेत. सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम करतो असं सांगून पैसे घेतल्यानंतरही चित्रपटात काम न करता दिलेले पैसे माघारी न दिल्याचा आरोप चित्रपटाचे निर्माते सचिन ससाने यांनी केला आहे.
सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम करतो असं सांगून ५ लाख पैसे घेतल्यानंतरही चित्रपटात काम न करता दिलेले पैसे माघारी न दिल्याचा आरोप चित्रपटाचे निर्माते सचिन ससाने यांनी केला आहे. यासंदर्भात निर्माते सचिन ससाने यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळात याविषयी तक्रार दाखल केली आहे.
गेल्या दोन महिन्यापूर्वी गिन्नाड नावाच्या चित्रपटात सयाजी शिंदे यांना काम करण्यासाठी प्रत्येक दिवसाला एक लाख रुपये याप्रमाणे पाच दिवसाचे पाच लाख रुपये निर्माते सचिन ससाने यांनी दिले होते. मात्र ज्यावेळी चित्रपटाचे काम सुरू झाले त्यावेळी सयाजी शिंदे यांनी स्क्रिप्ट मध्ये बदल करायला सुरुवात केली. निर्माते सचिन ससाने यांनी दिलेली अकरा पानाची स्क्रिप्ट फाडून टाकत चित्रपटाचे काम थांबवले. चित्रपटात काम करण्याचे थांबवल्यानंतर सयाजी शिंदे यांना दिलेले पाच लाख रुपये आणि या दरम्यान झालेली नुकसान दहा लाख रुपये असे एकूण 15 लाख रुपयाची मागणी निर्माते सचिन ससाने यांनी सयाजी शिंदे यांना केली होती. सयाजी शिंदे यांनी देखील हे पैसे देतो असं मान्य केलं होतं मात्र ते अद्याप आतापर्यंत दिले नसल्याचं निर्माते सचिन ससाने सांगत आहेत.
दरम्यान , या प्रकरणी सयाजी शिंदेची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण येणाऱ्या काळात कोणतं वळण घेतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.