मुंबईतील एकमेव जपानी बुद्ध विहार, बाबासाहेब आंबेडकरांचाही होता संबंध

मुंबई शहरात अनेक ऐतिहासिक मंदिरे तसेच ऐतिहासिक स्थळं आहेत. त्यापैकीच मुंबईतील वरळीत जपानी बुद्ध विहार ‘निप्पोन्झान म्योहोजी’ आहे. गगनाला भिडणार्‍या इमारती उभ्या राहिल्या असून त्यांच्या गराड्यात हे अप्रतिम छोटेसे बुद्ध विहार लक्ष वेधून घेते. या विहाराच्या आवारात मोठमोठे वृक्ष असून उत्तराभिमुख असलेल्या या विहारातील सफेद संगमरवरी बुद्धमूर्तीचे दर्शन रस्त्यावरून जाताना सुद्धा होते.

कधी झाली बुद्ध विहारची स्थापना?

सन १९३१-३८ दरम्यान जपानी निचिरेन पंथाचे फुजी गुरुजी भारतात आले असता भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी वरळी येथे टेकडीखाली बुद्ध विहार बांधले. सन १९५० च्या दरम्यान याचे नूतनीकरणाचे काम सुरू झाले व दोन वर्षात पूर्ण करण्यात आले. नवीन आकर्षक चैत्यगृहासारखे बुद्ध विहार बांधण्यास त्यावेळी उद्योगपती जुगल किशोर बिर्ला यांनी मदत केली. या विहाराचे नूतनीकरणाचे काम चालू असताना स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे भेट दिली होती, असं बुद्ध विहाराचे भिक्षू टी मोरीटा यांनी सांगितले.

बुद्ध विहार रचना कशी?

बुद्ध विहारची रचना ही जुन्या पद्धतीची असून संगमरवरी दगडापासून बनवलेलं आहे. बुद्ध विहारच्या प्रवेशद्वारा समोरील प्रार्थना क्षेत्र, मुख्य दारात मोठे आणि ठळक बौध्द शिलालेख, तसेचबुद्ध विहार परिसरात अनेक ठिकाणी जपानी भाषेत शिलालेख पाहायला मिळतात. बुद्ध विहार अगदी सध्या पद्धतीचे असून आजूबाजूचा परिसर स्वच्छ पाहायला मिळतो. भिंतीवर बुद्धाचं चरित्र दर्शवणारी चित्रं लावण्यात आलेली आहेत. प्रार्थनेच्यावेळी वापरण्यात येणारे ड्रम्सही तुम्ही बुद्ध विहारात पाहू शकता.बुद्ध विहारात दररोज सकाळी ६ वाजता आणि संध्याकाळी ५.३० ते ७ च्या दरम्यान प्रार्थना केली जाते.

डॉ.  बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध विहार संबंध 

सन १९५० च्या दरम्यान भारतीय संविधानाचे काम पूर्ण होताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोड बिलाच्या मागे लागले. २ जानेवारी १९५० रोजी ते दिल्लीवरून मुंबईस परतले. त्यावेळी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी मुंबई प्रदेश शेड्युल कास्ट फेडरेशन तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. २९ जानेवारी १९५० रोजी महाराष्ट्र मंडळ आणि इतर मराठी संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर १४ एप्रिल १९५० रोजी त्यांचा जन्मदिवस सर्व भारतभर साजरा करण्यात आला. २५ मे १९५० रोजी ते विमानाने कोलंबो (सिलोन) येथे गेले. तिथे त्यांनी भारतातील बौद्धधर्म या विषयावर भाषण दिले. तिथून येताना त्रिवेंद्रम आणि मद्रास येथे त्यांनी भेटी दिल्या. त्यानंतर दिनांक २९ सप्टेंबर १९५० रोजी त्यांनी वरळी येथील बुद्ध विहारात भाषण दिले व लोकांना बौद्धधर्म स्वीकारण्याचे आवाहन केले. तसेच बौद्ध धर्माच्या पुनरुत्थनासाठी व प्रसारासाठी यापुढील आयुष्य व्यतीत करीन असे त्यांनी जाहीर केले. ते हेच बुद्ध विहार आहे, जे नूतनीकरणानंतर जपानी बुद्ध विहार म्हणून प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.