वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या कारकिर्दीची सुरूवात राजश्रीच्या ‘अबोध’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटातून माधुरीने आपल्या अभिनयाची अशी छाप सोडली की, आजपर्यंत तिचे कौतुक होत आहे. या चित्रपटानंतर माधुरीने अभ्यासासाठी थोडा वेळ दिला आणि त्यानंतर तिने पुन्हा चित्रपटात पुनरागमन केले. आजवरच्या कारकिर्दीत माधुरीने जवळपास सगळ्या मोठ्या स्टार्सबरोबर काम केले आहे.
कोट्यवधी लोकांवर मनावर राज्य करणार्या माधुरीचे हृदय मात्र डॉ. श्रीराम नेने यांच्यावर आले होते. माधुरी श्रीराम यांच्या प्रेमात इतकी ‘वेडी’ झाली होती की, तिने त्यांच्यासाठी सर्व काही सोडले आणि त्यांच्याबरोबर स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. माधुरी आणि श्रीरामची प्रेमकथा कशी सुरू झाली, असे प्रश्न चाहत्यांना सतत पडत असतात. अशाच एका मुलाखतीत स्वत: माधुरीने तिच्या प्रेमकथेविषयी सांगितले होते. श्रीराम नेने यांच्याशी पहिली भेट कशी झाली सांगताना माधुरी म्हणाली की, त्यांची भेट हा केवळ योगायोग होता. दोघांची पहिली भेट माधुरीच्या भावाच्या पार्टीमध्ये (लॉस एंजेलिस) झाली होती.
आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा माधुरी श्रीराम यांना पहिल्यांदा भेटली तेव्हा ती एक सुपरस्टार होती. परंतु, तरीही श्रीराम नेनेंना तिच्याबद्दल माहित नव्हते. माधुरी एक अभिनेत्री आहे आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते हे त्यांना माहित नव्हते. पण माधुरीला श्रीराम यांची साथ आवडली होती.
त्यांच्या पहिल्या भेटीनंतर दोघांची छान मैत्री झाली. यानंतर, डॉ. नेने यांनी तिला एकदा विचारले की, तू माझ्याबरोबर डोंगरावर बाईक चालवण्यास येशील का? त्यावेळी माधुरीला वाटले की, छान आहे, तिथे पर्वत आणि बाईकसुद्धा आहेत. पण, तिथे जाणे फारच अवघड होते. येथूनच माधुरी आणि श्रीराम नेने एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. यानंतर दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.
जेव्हा माधुरीने अमेरिकन डॉक्टरशी लग्न केले, तेव्हा तिची कारकीर्द उंचावत होती. त्यावेळी तिच्या हातात अनेक नवे प्रकल्प होते. अशा परिस्थितीत माधुरी हवाई येथे दहा दिवसांचा हनिमून आटोपून भारतात परतली आणि सर्व प्रकल्प पूर्ण केले. त्यानंतर ती आपल्या पतीसमवेत अमेरिकेत स्थायिक झाली. बॉलिवूडला निरोप दिल्याच्या वृत्ताने माधुरीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.
अमेरिकेत जवळपास 12 वर्षे वास्तव्य केल्यानंतर माधुरीने पुन्हा भारतात परतली आणि त्याच बरोबर तिने पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात पदार्पण केले. माधुरी आणि श्रीराम यांना दोन मुलगे आहेत. अमेरिकेच्या प्रसिद्ध डॉक्टरांपैकी एक असलेले डॉ. नेने मुंबईतील एका मनपा रुग्णालयात सेवा देत आहेत.