उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधील समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी करोना आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी मोदी सरकारला दोष देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता त्यांच्याच पक्षाच्या अन्य एका खासदाराने अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं आहे. संभलचे समाजवादी खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालाय. करोना काही आजार नाहीय. करोना जर आजार असता तर जगात त्यावरील उपाय असता. करोेनाचे संकट हे सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेलं अजाब ए इलाही (संकट) आहे. अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास हे संकट संपेल, असं शफीकुर्र रहमान म्हणालेत.
शफीकुर्र रहमान यांनी भाजपा सरकारवर अनेक गंभीर आरोप केलेत. सध्याच्या सरकारने शरीयतमध्ये छेछाड करण्याबरोबरच आपल्या कार्यकाळामध्ये मुलांना पकडून देत त्यांच्या बलात्कार करणे, मॉब लिचिंग आणि इतरही अनेक गुन्हे सरकारने केलेत ज्यामुळे करोनासारखं आसमानी संकट देशात आलं आहे. मात्र या वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर शफीकुर्र रहमान यांनी बलात्कारासंदर्भातील आपलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रसारमाध्यमांनी मांडल्याचा दावा केलाय. शफीकुर्र रहमान यांनी आधी लस टोचून घेण्यासही विरोध केला होता. मात्र आता त्यांनी लसीकरणासाठी होकार दिलाय.