‘प्रसारमाध्यमांवर भाजपच्या सरकारने कधीही बंदी घातली नाही’

‘‘सध्या पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याचा आरोप केला जातो. मात्र, असा आरोप करणाऱ्यांना याचा विसर पडतो, की भाजपच्या कोणत्याही सरकारने कोणत्याही प्रसारमाध्यम संस्थेवर कधीही बंदी घातलेली नाही अथवा कोणाच्याही भाषणस्वातंत्र्यावर गदाही आणलेली नाही,’’ असे प्रतिपादन संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी रविवारी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र साप्ताहिक पांचजन्यने आयोजित केलेल्या परिषदेत बोलताना सिंग म्हणाले, की देशात पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाद सुरू झाला आहे. १९५१ मध्ये कलम १९ च्या दुरुस्तीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले, की काँग्रेस सरकारने भाषण स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्यासाठी घटनादुरुस्तीही केली होती. गमतीची गोष्ट अशी, की आज जे माध्यम स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करतात, ते हे विसरतात की अटलबिहारी वाजपेयींचे सरकार असो किंवा सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार असो, त्यांनी कधीही कोणत्याही प्रसारमाध्यम संस्थेवर बंदी घातली नाही किंवा कुणाच्याही भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संकोच केलेला नाही.

पूर्वी ‘पांचजन्य’वर लादलेली बंदी व निर्बंधांबद्दल बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित साप्ताहिकावर वारंवार कारवाई करणे हा फक्त राष्ट्रवादी पत्रकारितेवरील हल्लाच नव्हता, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संपूर्ण उल्लंघनही होते.

 ‘काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड फेकू नयेत!

काँग्रेसवर टीका करताना राजनाथ सिंह म्हणाले, की या मोठय़ा जुन्या पक्षाचा संपूर्ण इतिहास सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याच्या उल्लंघनाच्या घटनांनी भरलेला आहे. काँग्रेस सरकारने भाषण स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्यासाठी घटनादुरुस्तीही केली होती. जे लोक काचेच्या घरात राहतात त्यांनी इतरांवर दगडफेक करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.