पायाच्या दुखापतीमुळे धाकटय़ा भावाला कबड्डी खेळणे थांबवावे लागले. बहिणीने अभ्यासाला प्राधान्य देत खेळांमध्ये कारकीर्द न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, थोरला भाऊ असलेल्या स्वप्निल कुसळेने नेमबाजीवर लक्ष केंद्रित करत २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकण्याचा निर्धार केला आहे.
२६ वर्षीय स्वप्निलने या महिन्याच्या सुरुवातीला बाकू (अझरबैजान) येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात तिहेरी पदककमाई केली. त्याने वैयक्तिक आणि पुरुष सांघिक गटात रौप्य, तर मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीबाबत स्वप्निल समाधानी असून आगामी काळात यापेक्षाही दर्जेदार खेळ करण्याचे त्याचे ध्येय आहे. ‘‘बाकू येथे झालेल्या विश्वचषकापूर्वी मी खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे या स्पर्धेत यशस्वी कामगिरीचा मला विश्वास होता. मला तीन पदके जिंकता आली याचे नक्कीच समाधान आहे. या तीनपैकी वैयक्तिक गटातील रौप्यपदक माझ्यासाठी सर्वात खास आहे. या गटात सहभागी झालेल्या सर्वच नेमबाजांना ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा अनुभव होता. तसेच ते वयानेही माझ्यापेक्षा मोठे होते. त्यामुळे या गटात पदक जिंकणे सोपे नव्हते,’’असे स्वप्निल म्हणाला. त्याने गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या विश्वचषकातही सांघिक गटात सुवर्णपदक मिळवले होते.
मूळचा कोल्हापूरजवळील कांबळवाडीचा रहिवासी असलेल्या स्वप्निलने २००८ मध्ये सांगली येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवला आणि पुढील वर्षी खेळ निवडण्याच्या वेळी त्याने नेमबाजीला पसंती दिली. त्याने २००९ ते २०१४ या कालावधीत क्रीडा प्रबोधिनीच्या नाशिक केंद्रात सराव केला. त्यानंतर मध्य रेल्वेमध्ये नोकरी मिळाल्यावर तो पुण्यात वास्तव्यास आला आणि तिथे बालेवाडी स्टेडियममध्ये सरावाला प्रारंभ केला. माजी ऑलिम्पिकपटू दीपाली देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा स्वप्निल आता स्वत: ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे.
ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे आणि पदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे. मात्र या ध्येयपूर्तीसाठी त्याआधीच्या स्पर्धावरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आगामी काळात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताची निवड चाचणी होणार आहे. निवड चाचणीत दर्जेदार कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवण्याचा आता माझा प्रयत्न असेल. या स्पर्धेत पदक जिंकायला मला नक्कीच आवडेल,’’ असेही स्वप्निलने नमूद केले.