नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून राज्यातील राजकारण तापलेलं आहे. याचबरोबर महाविकास आघाडीमधील नेत्यांमधूनही या प्रकरावरून काँग्रेसवर नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.पक्षविरोधी भूमिका घेऊन शिस्त मोडल्याने ही सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मान्यतेने शिस्तपाल समितीने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात चौकशी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. काँग्रेसने सुधीर तांबेंवरील निलंबनाच्या कारवाईचे पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.
काँग्रेसने सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिला असतानाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांना अपक्ष अर्ज भरायला मदत केली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. ही पक्षासोबत फसवेगिरी आहे. तर सत्यजीत तांबे यांनी आपण भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचे विधान केले. तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.