राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे मंगळवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांचा या घटनापीठात समावेश आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारच्या वैधतेला आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी आव्हान दिले होते. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना अपात्र ठरविण्याची त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदावरून झालेल्या हकालपट्टीला आव्हान दिले आहे. प्रभू यांनी भरत गोगावले यांच्या मुख्य प्रतोदपदी केलेल्या नियुक्तीला विरोध केला आहे. या विविध मुद्दय़ांवरील पाच-सहा याचिकांवर घटनापीठापुढे मंगळवारी सुनावणी होणार आहे.
शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा की त्यांच्याही निवडीला आव्हान दिल्याने त्याबाबत सर्वोच्च न्यायालय निकाल देणार, या दृष्टीने मंगळवारच्या सुनावणीत विचारविनिमय व युक्तिवाद होण्याची अपेक्षा आहे. अपात्रतेच्या याचिका जर विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणीसाठी पाठविल्या गेल्या, तर त्यावर निर्णय होण्याआधी अन्य याचिकांवर सुनावणी होण्याची फारशी शक्यता नाही. त्यामुळे या याचिकांवर अध्यक्षांकडे सुनावणी व्हावी, असा युक्तिवाद शिंदे गटातर्फे करण्यात येणार आहे. या मुद्दय़ांवर घटनापीठ कोणता निर्णय देणार, याकडे राजकीय नेत्यांबरोबरच राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
* याआधी सर्वोच्च न्यायालयाने खरी शिवसेना कोणती, हे ठरविण्याबाबतच्या निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला होता.
* आयोगाने तूर्त शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवून दोन्ही गटांना नवे पक्षनाव आणि निवडणूक चिन्हवाटप केले आहे. त्यानुसार शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धगधगती मशाल आणि शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेने’ला ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले आहे.