भाजपचं मिशन लोटस ठरलं, राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील तीन नेत्यांवर मोठी जबाबदारी

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील तीन नेत्यांवर राज्यसभेची जबाबदारी सोपविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या तीन नेत्यांमध्ये आशिष शेलार,गिरीश महाजन आणि प्रसाद लाड यांचा समावेश आहे. राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजपला 14 मते कमी पडत आहेत. या मतांच्या जादूई आकडेवारीची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी भाजपने या त्रिमुर्तीवर जबाबदारी दिली आहे.

भाजपचे सध्याचे संख्याबळ 122 इतकी आहे. राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे 28 मते राहतात. तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपला 14 मतांची गरज आहे. आता या 14 मतांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी भाजपने आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रसाद लाड या त्रिमुर्तीवर दिली आहे.

राज्यसभेची सहावी जागा निवडून आणण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. कागदावर सोपी असलेली राज्यसभेची निवडणूक प्रत्यक्षात मात्र शिवसेनेसाठी जड जाण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीकडे अतिरिक्त मतांची संख्या जास्त असूनही राज्य सरकारची धाकधूक वाढली आहे. पहिल्या दोन उमेदवारांना विजयी होण्याइतकी मते देवून भाजपकडे 28 मते अतिरिक्त राहतात. त्यामुळे तिसरे उमेदवार धनंजय महाडिकांना निवडून आणण्यासाठी भाजपला पहिल्या पसंतीची आणखी 14 मतांची गरज आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडे तीन उमेदवारांना पहिल्या पसंतीची मतं देवूनही 38 अतिरिक्त मते शिल्लक राहतात. म्हणजे शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 4 मतांची गरज आहे. पण सहाव्या उमेदवाराने पहिल्या पसंतीच्या 42 मतांचा कोटा पूर्ण न केल्यास मग मात्र दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागणार आहेत. ही मते मोजताना अगोदरच्या पाच उमेदवारांपैकी सर्वाधिक जास्त मते ज्या विजयी उमेदवाराने मिळवली आहेत. त्याची दुसऱ्या क्रमांकाची मते मोजली जातात. म्हणजे भाजपच्या एखाद्या विजयी उमेदवाराची मते समजा 46 आहेत आणि इतर उमेदवारांची मते त्यापेक्षा कमी आहेत. तर भाजपच्या त्या विजयी उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची मते पहिली मोजली जातील.

दरम्यान, भाजपने तीन नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी दिली असल्याची बातमी ताजी असताना एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मतांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपचे उमेदवार मोर्चेबांधणी करत आहे. आमदार फुटू नये म्हणून भाजपने आपल्या आमदारांसाठी मुंबईतील पंचतारांकित ट्रायडेंट हॉटेल बूक केले आहे. पण, याच हॉटेलमध्ये शिवसेनेचे 8 ते 10 जून या कालावधीसाठी सर्व आमदार, समर्थक लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांना मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. त्याच ट्रायडेंट हॉटेलमध्ये भाजपचेही आमदार राहणार असल्याची माहिती मिळताच शिवसेनेनं त्यांच्या आमदारांसाठी अन्य हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.