विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असून, काहीही झाले तरी आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास आझाद मैदानात पावसाने हजेरी लावली, मात्र भर पावसातही आंदोलन सुरूच होते. आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम असून पाऊस येवो, वादळ येवो आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नसल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. आमच्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावीच लागेल, एसटी विलीनीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचेही यावेळी एसटी कर्माचाऱ्यांनी म्हटले.
दरम्यान रविवारी रात्री मुंबईत अनेक ठिकाणी पावसाच्या हालक्या सरी कोसळल्या, मात्र रात्री साडेबाराच्या सुमारास आझाद मैदानात पावसाने जोर पकडला. भर पावसातही आंदोलन सुरूच होते. पावसापासून बचावासाठी अनेक जणांनी प्लास्टिकचे कव्हर घातल्याचे पहायला मिळाले. पावसाचा जोर वाढल्याने काही जणांनी इतर ठिकाणी देखील आसारा घेतला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
गेल्या 10 ते 12 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकाराला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी सेवा ठप्प असून, प्रवाशांचे हाल सुरू आहेत. तसेच एसटीला दिवसाकाळी तब्बल 12 कोटींचा फटका बसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे आणि कामावर रूजू व्हावे, अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा सरकारकडून देण्यात आला होता. मात्र तरी देखील कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम राहिल्याने यातील अनेक जणांचे निलंबन करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलनीकरण करावे. कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवेत समावेश करून त्यांना क दर्जा द्यावा. घरभाडे, महागाईभत्ता यामध्ये वाढ करावी. निलंबीत करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे अशा विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.