राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आता विद्यार्थी देखील कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. साताऱ्यातील मेडिकल कॉलेजच्या 82 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याची बातमी ताजी असताना आणखी एक बातमी येत आहे. नाशिक शहरातल्या मुलींच्या वसतिगृहात कोरोनानं शिरकाव केला आहे.
मुलींच्या वसतिगृहातील 17 विद्यार्थिनींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयात ही घटना समोर आली आहे. 52 विद्यार्थिनींचे शनिवारी स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
विद्यार्थिनींना वसतिगृहातच विलगीकरणात असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. महाविद्यालय इमारतही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आलं आहे.
राज्यात आज 11 हजार 877 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात 50 रुग्णांचा ओमायक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.