विकास करण्याच्या घाईमध्ये माणसाने अनेक गोष्टी गमावल्या आहेत. पर्यावरण बदल हा त्याचाच दुष्परिणाम आहे. त्याची जाणीव झाल्यानंतर देखील सुधारणेला नेमकी कोणी सुरुवात करायची याची जगभरात द्विधा मनस्थिती असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई वातावरण कृती आराखड्यातून सर्वांसमोर आदर्श घालून दिला आहे. विकास हा मुळावर उठणारा नव्हे तर शाश्वत टिकणारा असला पाहिजे, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.
बदलत्या वातावरण स्थितीला सामोरे जाताना मुंबई महानगराला वातावरण सक्षम बनवण्यासाठी तसेच मुंबईतील विकास कामां ना शाश्वत दृष्टिकोन प्रदान करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निर्मित ‘मुंबई वातावरण कृती आराखडा अहवाल’ चे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य (ऑनलाइन) पद्धतीने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या लोकार्पण निमित्ताने सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित समारंभात राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे; पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मुंबई महानगराच्या तापमानात देखील अलीकडे मोठा फरक दिसून येतो. मुंबई महानगराचा विकास होताना त्याचे रूपांतर जणू काँक्रीटच्या जंगलात झाले आहे. विकास नेमका कशासाठी हवा याचा विचार आता फक्त मुंबईच नव्हे तर संपूर्ण जगाने करण्याची वेळ आली आहे. मुंबई महानगराला 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी गारगाई पिंजाळ प्रकल्प हाती घेतला होता. मात्र त्यासाठी पाच लाख झाडांची किंमत मोजावी लागणार होती. त्यामुळे तो प्रकल्प रद्द केला. कारण पाणी मिळवण्यासाठी पर्यावरण गमावून चालणार नाही. आरे वनक्षेत्र वाचवणं हे देखील माझं कर्तव्यच होतं. कारण दुर्घटना घडल्यावर अश्रू गाळून उपयोग नाही. जीव वाचवण्यासाठी वेळीच कृती केली पाहिजे.