पंजाबमध्ये लवकरच निवडणुका होणार असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या पंजाब दौऱ्यावर आहेत. पंजाबमध्ये अरविंद केजरीवालांनी आज मोगा येथे एका सभेला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. आम आदमी पक्षाने सरकार स्थापन केल्यास 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना 1000 रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच केजरीवाल यांनी आज रात्री एका ऑटो चालकाच्या घरी जेवण केले. खुद्द केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
एका ऑटोचालकाने मला त्याच्या घरी जेवायला बोलावले, तेव्हा मी खूप प्रभावित झालो, असे ते म्हणाले. आम्ही तिथे जेवायला नक्की जाऊ म्हणत रात्रीच्या जेवणानंतर केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षाचे खासदार भगवंत मान आणि अन्य एका नेत्यासोबत ऑटो राईडचा आनंदही घेतला. केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटले की, ‘दिलीप तिवारी यांनी आज आम्हाला त्यांच्या घरी जेवायला बोलावले. त्याच्या कुटुंबाने खूप प्रेम दिले. अतिशय चवदार अन्न होते. मी त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आता दिल्लीत माझ्या घरी जेवायला बोलावलेय.
अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या पंजाब दौऱ्यावर आहेत. पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार आल्यास प्रत्येक महिलेला दरमहा एक हजार रुपये दिले जातील, असे ते म्हणाले. 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक महिलेला हा लाभ मिळेल आणि ही रक्कम वृद्ध मातांना वृद्धापकाळ पेन्शनपासून वेगळी असेल.